शहरात दसऱ्यालाही पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पुणे - शहर आणि परिसरात येत्या शनिवारी (ता. 30) दसऱ्याच्या दिवशी पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली आहे. त्यानंतर येत्या गुरुवारपर्यंत (ता. 5) काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असेही खात्याने सांगितले आहे.

शहरात सकाळपासून उकाडा जाणवत होता. दुपारपर्यंत आकाश ढगाळ होते; पण दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात ढगांची गर्दी झाली. दुपारी तीन वाजता अंधारून आले आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडल्या. संध्याकाळी साडेपाच पर्यंत 1.3 मिमी पावसाची नोंद झाली होती. कमाल तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा वाढलेला होता. स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे हा पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. दसऱ्याच्या दिवशीही पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली.

राज्यातील काही भागांत हवेचा दाब कमी-जास्त होत आहे. त्यामुळे कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला; तर कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडल्याची नोंद शुक्रवारी झाली.

कोकणातील बहुतांश ठिकाणी शुक्रवारी ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी सकाळपासून ऊन पडले होते. त्यामुळे कोकणात सकाळपासून उकाडा वाढला होता. पुणे शहराच्या परिसरात हलका पाऊस पडला. कोकण, गोव्यात काही ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्‍यता आहे.