चिंब पावसात गिर्यारोहणाचे थ्रील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

गिर्यारोहणासाठी  गडकिल्ले
राजगड, सिंहगड, तोरणा, रायगड, लोहगड, तिकोना, राजमाची, कोराईगड, मल्हारगड,  हरिश्‍चंद्रगड, तुंग, घणगड, सुधागड, सरसगड, चावंड इत्यादी.

पुणे - चिंब पावसात ग्रुपबरोबर फिरण्याची धमाल अनेकांना पावसाळी गिर्यारोहणाकडे नेते अन्‌ सुरू होतो गडकिल्ल्यांचा अनोखा प्रवास. या गिर्यारोहणाची क्रेझ सध्या तरुणांमध्ये वाढली आहे; पण ठिसूळ दगड-मातीमुळे गडकिल्ल्यांवर मार्ग निसरडे व धोकादायक बनतात. त्यामुळे तरुणाईने गिर्यारोहणाला जाताना काळजी घ्यावी, असा सल्ला अनुभवी गिर्यारोहकांनी दिला आहे. पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली असून, त्यामुळे फ्रेंड्‌स ग्रुपचे भटकंतीसाठी ‘हॉट डेस्टिनेशन्स’ ठरले आहेत. रायगडपासून ते राजमाचीपर्यंत गडकिल्ल्यांवर गिर्यारोहणाला जाणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. तसेच इतर गडकिल्ल्यांवरही गिर्यारोहणासाठी जाणाऱ्या तरुणाईची संख्या वाढली आहे. 

याबाबत सेफ क्‍लायबिंग इनिशिएटिव्ह संस्थेचे स्वानंद जोशी म्हणाले, ‘‘गिर्यारोहणासाठी जाताना तरुणांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.’’ गिर्यारोहक आशिष क्षीरसागर म्हणाला, ‘‘गड-किल्ल्यावर पावसाळी गिर्यारोहण करण्याचा अनुभव वेगळाच असतो. गिर्यारोहण हे माझे पॅशन आहे. कोणताही ऋतू असो, मी ग्रुपसोबत गिर्यारोहणाला जातो.’’ 

ही काळजी घ्या
कुठल्याही ट्रेक, सहलीला जाण्यापूर्वी त्या स्थळाची व मार्गाची पूर्णपणे माहिती घ्यावी. सोबत गाइड व माहिती पुस्तिका ठेवावी.
पाऊस, ढग, वारा आणि धुक्‍यामुळे रस्ता चुकण्याचा व घसरण्याचा धोका असतो, त्यामुळे वाहन काळजीपूर्वक चालवा.
ट्रेकिंगला जाताना पायात ट्रेक किंवा स्पोर्ट शूज घाला. 
नद्या किंवा समुद्रकिनारी भटकंतीला गेला असाल, तर खोलीचा अंदाज घेऊनच पाण्यात, प्रवाहात उतरा. 
शक्‍यतो वॉटरप्रूफ बॅग घेऊन भटकंतीला निघावे, त्यामुळे कॅमेरा, मोबाईल व लॅपटॉपची काळजी घेता येईल.
तुम्ही जर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणार असाल, तर त्याचे वेळापत्रक सोबत ठेवा.
खासगी वाहनाने प्रवास करणार असाल तर स्टेपनी, टूल, प्रथमोपचार पेटी, मेणबत्ती, काडेपेटी, औषधसामग्री आणि ओळखपत्र जवळ ठेवा.