‘रेफ्युज एरिया’ विकला!

‘रेफ्युज एरिया’ विकला!

पुणे - तुम्ही २४ किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतीत राहाता? त्याचा ताबा अजूनही बांधकाम व्यावसायिकाकडेच असल्यास इमारतीत ‘रेफ्युज एरिया’ आहे का? याची नक्की खात्री करा. कारण, तुमच्या सुरक्षिततेसाठी इमारतीमध्ये हा ‘एरिया’ असायलाच हवा. तो बंधनकारक आहे. पण, तुम्हाला गाफील ठेवून संबंधित बांधकाम व्यावसायिक तो विकण्याची शक्‍यता आहे.  हा ‘एरिया’ विकणे सोडाच पण, त्याचा अन्य कारणांसाठीही वापर नियमबाह्य असेल. हा प्रकार म्हणजे, तुमच्या जिवाशी खेळच असेल! अशा गंभीर बाबींची दखल घेऊन महापालिकेच्या अग्निशामक दलाने ३६ जणांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यातील तिघा जणांवर कठोर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

शहरात गेल्या काही वर्षांमध्ये भल्यामोठ्या इमारती उभ्या राहात आहेत. त्यात, १५ मीटरपासून शंभर मीटर एवढ्या उंचीच्या निवासी आणि व्यावसायिक इमारतींना महापालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, अशा इमारतींपैकी २४ मीटर आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘रेफ्युज एरिया’ ठेवणे बंधनकारक आहे. तसेच त्‍यानंतर २४ पेक्षा अधिक उंचीच्या इमारतीमध्ये प्रत्‍येक सातव्या मजल्‍यावर ही जागा असायला हवी. बांधकामाच्या आराखड्यात त्याचा उल्लेख अपेक्षित आहे. त्यानुसार त्या त्या मजल्यावरील रहिवाशांच्या प्रमाणात ‘रेफ्युज एरिया’ असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून स्पष्ट केले जाते. मात्र, सोसायटी हस्तांतरण करण्याआधीच तो विकला जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या जागेचा अन्य कारणांसाठी वापर होत असल्याचेही दिसून आले आहे. त्याकरिता ती जागा भाडेतत्त्वावर देण्याचा उद्योगही केला जातो आहे. सहकारनगर आणि एनआयबीएम रस्त्यावरील एका इमारतीमधील ही जागा विकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

त्यामुळे रहिवाशांची ही फसवणूक नव्हे तर त्यांच्या जिवाशी खेळच सुरू असल्याचे यावरून दिसून येत आहे.

इमारतींच्या उंचीची मर्यादा शिथिल
नवीन बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल) इमारतींच्या उंचीची मर्यादा शिथिल केली आहे. त्यामुळे पुणे शहरात आता १०० मीटरपेक्षा म्हणजेच जवळपास ३० ते ३२ मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या इमारती उभारता येणार आहेत. मात्र सध्या शहरात जास्तीत जास्त ७० ते ७५ मीटर उंचीच्याच इमारती आहेत. अशा इमारतींचा आकडा १५ इतका आहे. तसेच १०० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारती उभारण्याबाबतचे चार प्रस्ताव महापालिकेकडे आले आहेत.

इमारतींमध्ये ही जागा ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, तिचा गैरवापर करण्याबाबतच्या तक्रारी येतात. त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाते. शिवाय, या जागेची पाहणीही केली जाते. 
- प्रशांत रणपिसे, प्रमुख अग्निशामक दल, महापालिका

बांधकामाचा आराखडा मंजूर करून घेईपर्यंत कागदोपत्री रेफ्युज एरिया दाखविला जातो. मात्र, पूर्णत्त्वाचा दाखला घेतल्यानंतर ती जागा विकणे िंकवा कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर देण्यात येते. त्यामुळे रहिवाशांची फसवणूक होते. इमारतीमध्ये अशा प्रकारची जागा असते, याची कल्पना रहिवाशांना नसते. त्यातून ती विकण्याचे प्रकार घडतात. मात्र, अशा बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होते. अशा घटना रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. 
- विजय शिंदे, माजी अध्यक्ष शिक्षण मंडळ, पुणे महापालिका.

रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेफ्युज 
एरिया महत्त्वाचा आहे. नियमाप्रमाणे तो विकता किंवा भाडेतत्त्वावर देता येत नाही. मुळात अशा प्रकारची जागा विकत घेणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा घटना घडत असतील, तर त्याची चौकशी करून कारवाई करू.
- युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

काय आहे रेफ्युज एरिया 
बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) आणि ‘नॅशनल बिल्डिंग कोड’नुसार शहरातील २४ मीटर आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतींमध्ये ‘रेफ्युज एरिया’ बंधनकारक आहे. इमारतींध्ये आग किवा तशा प्रकारची घटना घडल्यास रहिवाशांना सुरक्षितपणे राहाता यावे, यासाठी ही जागा निश्‍चित करण्यात आली आहे. त्यात, प्रत्येक व्यक्तीला ०. ३३ चौरस मीटर इतकी जागा ठेवणे अपेक्षित असून, त्याप्रमाणात इमारतीमधील एकूण रहिवाशांच्या संख्येच्या प्रमाणात ‘रेफ्युज एरिया’ असायला हवा. त्यामुळे ही जागा विकणे किंवा भाडेत्त्वावर देता येत नाही. तसे बंधनकारक आहे. ही जागा असलेल्या ठिकाणी लाल रंगाच्या फलकावर पांढऱ्या अक्षरात ‘रेफ्युज एरिया’ असा उल्लेख असला पाहिजे. त्याचा आकारही ३ बाय ५ फूट हवा. 

...तर प्रसंगी गुन्हाही दाखल
इमारतींमध्ये रेफ्युज एरिया बंधनकारक असला तरी, ज्या सदनिकांना स्वतंत्र बाल्कनी आणि टेरेस (छत) आहे, अशा इमारतींसाठी ‘रेफ्युज एरिया’ची गरज नसते. मात्र, शहरातील २४ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या जवळपास ऐंशी टक्के इमारतींमध्ये ही जागा हवी, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी किंवा पाहणीदरम्यान ही जागा न ठेवलेल्या सोसायट्यांचे पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांना नोटीस दिली जाते. त्यानंतर कारवाई करण्यात येते. 

शिकवणी, योगांसाठी नाही 
‘रेफ्युज एरिया’मध्ये विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यासह शिकवणी, योगा, बैठका घेता येत नाहीत. तसेच, या जागेचा दरवाजा २४ तास खुला ठेवणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास संबंधिताविरोधात ‘महाराष्ट्र फायर ॲण्ड लाइफ सेफ्टी ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. सोसायटीचा ताबा बांधकाम व्यावसायिकाकडे असल्यास व्यावसायिकविरोधात अन्यथा सोसायटी असेल तर सोसायट्याच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई होऊ शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com