वादनाच्या तालात रंगली तरुणाई!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

'ढोल- ताशा हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य घटक आहे. गणेशोत्सवात ढोल- ताशांचा गजर महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच कुठेतरी या स्पर्धेतून आपल्याला ढोल- ताशा वादनातील विविध पैलू पाहायला मिळणार आहेत. डीजे आणि आधुनिक संगीतामुळे कुठेतरी हेच वैभव संपुष्टात आले आहे. पण, या स्पर्धेतून नक्कीच ढोल- ताशासारख्या पारंपारिक वाद्यांचे संवर्धन होऊ शकेल, याची खात्री वाटते.
- डॉ. रमेश रांका, संचालक, रांका ज्वेलर्स

'सकाळ ढोल- ताशा स्पर्धे'ला जल्लोषात प्रारंभ; प्रेक्षकांनीही धरला ठेका
पुणे - पावसाच्या सरींत, "जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात पहिला ठेका पडला अन्‌ लय, ताल आणि निनाद यांचा अनोखा मेळ साधणाऱ्या, "सकाळ ढोल- ताशा स्पर्धे'ला बुधवारी जल्लोषपूर्ण वातावरणात सुरवात झाली. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने ठेक्‍याची बेधुंद लहर धरली आणि वादनाच्या तालात सारी तरुणाई रंगून गेली. युवा जोश अन्‌ वादनातील ऊर्जेने प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावला. सुरेख वादन अन्‌ झांजांच्या लयीवर टाळ्या-शिट्यांची बरसात झाली... शहरी वादनाच्या ठेक्‍याला ग्रामीण ढंगाच्या वादनाने मोठी टक्कर दिली. वादन करणारे वादक अन्‌ त्यांच्या तालावर ठेका धरणाऱ्या तरुणाईने स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला.

"सकाळ माध्यम समूहा'च्यावतीने, ढोल- ताशा महासंघाच्या सहकार्याने घेण्यात येणाऱ्या "रांका ज्वेलर्स' प्रायोजित, पॉवर्डबाय टायझर "सकाळ ढोल- ताशा स्पर्धे'चा आव्वाज सगळीकडे घुमला. "रांका ज्वेलर्स'चे संचालक डॉ. रमेश रांका यांच्या हस्ते गणेशपूजनाने स्पर्धेला सुरवात झाली. "रांका ज्वेलर्स'चे संचालक वस्तुपाल रांका, श्रेयस रांका, मानव रांका, टायझरचे संचालक कुणाल मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, "सकाळ'चे वरिष्ठ सरव्यवस्थापक शैलेश पाटील आणि महासंघाचे सचिव संजय सातपुते उपस्थित होते.

स्पर्धेची सुरवात जय श्रीराम ढोल- ताशा पथकाच्या शैलीदार वादनाने झाली. दणकेदार वादनाने पथकाने सुरवात केली अन्‌ उपस्थितांची मने जिंकली. खासकरून ताशावादनाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. पिंरगुटच्या "हनुमान तरुण मंडळा'ने सादर केलेल्या ग्रामीण बाजाच्या वादनावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ग्रामीण ठेका अन्‌ ग्रामीण तोरा घेऊन स्पर्धेत उतरलेल्या या पथकाने आपल्या मातीतील वादनाचे वेगळे रूप सगळ्यांसमोर सादर केले. त्यानंतर शिवदिग्विजय ढोल- ताशा पथकाच्या वादनात दिसलेल्या एकसंधतेने व लयबद्धतेने सर्वांना आश्‍चर्यचकित केले. वादनातील लयीने आणि ध्वज पथकाच्या सादरीकरणाने सगळ्यांचे लक्ष वेधले.

शिवप्रताप वाद्य पथकाच्या अनुभवी वादकांच्या शैलीदार वादनाला प्रेक्षकांची वाहवा व वन्स मोअर मिळाला, तर शंभूगर्जना ढोल- ताशा पथकाच्या वादनातही वैविध्यता पाहायला मिळाली. एकूणच सर्व ढोल- ताशा पथकांनी केलेल्या वादनात एक स्फूर्तीचा व ऊर्जेचा मेळ पाहायला मिळाला. स्पर्धेचे परीक्षण गिरीश सरदेशपांडे, महेश मोळवडे आणि साहेबराव जाधव करत आहेत. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. शुक्रवारपर्यंत (ता. 11) ही स्पर्धा कर्वेनगर (राजाराम पुलाजवळ) येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून पाहता येईल. स्पर्धेच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी सकाळी दहा वाजल्यानंतर उपलब्ध असतील.

गुरुवारी (ता. 10) वादन करणाऱ्या ढोल- ताशा पथकांची नावे
1) समाधान ढोल- ताशा पथक
2) श्री सुधर्मा ढोल- ताशा पथक
3) धुरंधर प्रतिष्ठान ढोल- ताशा पथक
4) मानिनी ढोल- ताशा पथक
5) शिवसाम्राज्य वाद्य पथक
6) शिवाज्ञा ढोल- ताशा पथक
7) मानाजी बाग ढोल- झांज पथक
8) कल्याण पूर्व बासरीवाला आधुनिक ढोल- ताशा पथक
9) ओम साई ग्रुप (वातुंडे)