क्षयरोग विभाग टाकतोय धापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - नादुरुस्त लिफ्ट, छातीचा एक्‍स-रे काढणारे बंद मशिन आणि जीवरक्षक उपकरणांची दुरवस्था आदींमुळे ससून रुग्णालयात क्षयरोगाच्या उपचारांसाठी आलेल्या रुग्णाला अक्षरशः धापा टाकाव्या लागत आहेत. विभागातील जबाबदार डॉक्‍टर फक्त कागदी घोडे नाचविण्यात दंग असल्याचे चित्र बुधवारी दिसले. 

वेगाने संसर्ग होणाऱ्या क्षयरोगाच्या उपचारांसाठी "ससून'मध्ये आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे, त्यामुळे क्षयरोगाच्या बाह्य आणि आंतररुग्ण विभागात रुग्णास दाखल केल्याचा मनस्ताप होत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. 

बाह्य रुग्ण विभागात उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना डॉक्‍टर नाहीत, म्हणून परत पाठविले जाते. याबाबत शकुंतला पवार म्हणाल्या, ""माझ्या नवऱ्याला खोकला असल्याने उपचारांसाठी त्यांना घेऊन सकाळी आठ वाजता "ससून'मध्ये आले. केस पेपर काढल्यानंतर क्षयरोग विभागात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तेथे डॉक्‍टर नाहीत, असे सांगून परत 60 क्रमांकाच्या खोलीतील डॉक्‍टरांकडे पाठविले.'' 

संबंधितांना कळविले असल्याचे उत्तर क्षयरुग्ण विभागातील अधिकाऱ्यांनी दिले. याबाबत विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल लोखंडे म्हणाले, ""लिफ्ट बंद पडल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. "एक्‍स-रे'सह इतर उपकरणे नादुरुस्त असल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना दिली आहे.'' 

लिफ्ट बंद असल्याने हाल 
क्षयरोगाच्या रुग्णांना चालताना दम लागतो, चार पावलेही ते चालू शकत नाहीत; मात्र ससून रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात गेल्या तीन दिवसांपासून लिफ्ट बंद असल्याने या रुग्णांना दोन मजले चालत जावे लागत आहे. दोन पायऱ्या चढल्यानंतर काही वेळ बसून पुन्हा चालतो, असे चित्र दिसत असल्याची माहिती येथील डॉक्‍टरांनी दिली. 

एक्‍स-रे मशिनही बंद 
या विभागात स्वतंत्र एक्‍स-रे मशिनची व्यवस्था केलेली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते मशिन बंद आहे, त्यामुळे रुग्णांना एक्‍स-रे काढण्यासाठी मानसिक आरोग्य केंद्रापासून ते मुख्य इमारतीपर्यंत चालत यावे लागते. रुग्णाला चालताना धाप लागते, त्यामुळे तो असंख्य वेळा रस्त्यात बसतो. प्रत्येक रुग्णाला चाकाची खुर्ची मिळत नाही, असे निरीक्षणही डॉक्‍टरांनी नोंदविले. 

बंद लिफ्टचे काम सुरू केले आहे, त्यातील बिघाड तपासून ते तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
- डॉ. मनजित संत्रे, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय