‘ससून’च्या सुसज्जतेसाठी लोकप्रतिनिधींची मदत  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे - रस्ते, पेव्हींग ब्लॉक, ड्रेनेज लाइन यासाठी कामांऐवजी रुग्ण कल्याणासाठी खासदार आणि आमदार निधीचा वापर करण्याचा नवीन कल पुण्यात निर्माण झाला आहे. त्यातून मध्य महाराष्ट्रातील गरीब रुग्णांचे आशास्थान असलेले ससून रुग्णालय अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी खासदार आणि आमदार निधीचा प्रभावी वापर करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. 

पुणे - रस्ते, पेव्हींग ब्लॉक, ड्रेनेज लाइन यासाठी कामांऐवजी रुग्ण कल्याणासाठी खासदार आणि आमदार निधीचा वापर करण्याचा नवीन कल पुण्यात निर्माण झाला आहे. त्यातून मध्य महाराष्ट्रातील गरीब रुग्णांचे आशास्थान असलेले ससून रुग्णालय अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी खासदार आणि आमदार निधीचा प्रभावी वापर करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. 

गोरखपूरमध्ये प्राणवायू अभावी गुदमरून मृत्यू झालेल्या बालकांची हृदयद्रावक घटना आणि त्यापाठोपाठ नाशिकमध्ये उघड झालेले एन्क्‍युबेटर कोंडवाडा प्रकरण यामुळे ससून रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदीसाठी वापरण्यात आलेला स्थानिक निधी वापरण्यात आल्याचे स्वागत करण्यात येत आहे. 

खासदार वंदना चव्हाण यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून ससून रुग्णालयास ३६ लाख रुपये किमतीचे तीन व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला होता. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, यापूर्वी आमदार अनंत गाडगीळ यांनीही त्यांच्या आमदार निधीतून व्हेंटिलेटर ससून रुग्णालयाला दिली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी ४० पर्यंत असलेली व्हेंटिलेटरची संख्या ७५ पर्यंत वाढली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. रस्ते, ब्लॉक्‍स, ड्रेनेज अशा कामांसाठी निधीचा वापर न करता रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्‍यक उपकरण खरेदीसाठी हा निधी वापरण्यात येत असल्याचे यातून दिसत आहे.

या बाबत चव्हाण म्हणाल्या, ‘‘व्हेंटिलेटर देण्याचा प्रस्ताव देताना गोरखपूर किंवा नाशिक या घटना घडल्या नव्हत्या; पण व्हेंटिलेटरची गरज रुग्णालयाला होती. त्यामुळे स्थानिक विकास निधी हा यासाठी वापरता येईल असा विश्‍वास वाटला. स्वाइन फ्लूसह श्‍वसनाचे विकार वेगाने वाढत आहे. अशा रुग्णांवर प्रभावी उपचारांसाठी हे व्हेंटिलेटर उपयुक्त ठरतील. ते रुग्णालयात व्यवस्थित वापरले जावे, अशी अपेक्षा आहे.’’

खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आवाक्‍याबाहेर गेली आहे. व्हेंटिलेटरवरील उपचारांचा खर्च रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाइकांना परवडत नाही. ससून रुग्णालयात व्हेंटिलेटरची संख्या वाढत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देता येईल. त्यातून रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचावेल.
- डॉ. अजय चंदनवाले,  अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय