स्वर-रंगांची मुक्त उधळण 

स्वर-रंगांची मुक्त उधळण 

पुणे - तब्बल 24 तारांचे ते वाद्य मैफलीच्या केंद्रस्थानी होते. नखांना लावलेल्या सोनेरी रंगाच्या "स्टिक'ने त्यावर वादन सुरू होते. ते एकच वाद्य असले तरी अनुभूती मात्र वेगवेगळ्या वाद्यांची करून देत होते. कधी सतार, तर कधी सरोद, कधी संतूर, तर कधी व्हायोलिन, कधी-कधी वीणासुद्धा... अशा वेगवेगळ्या वाद्यांमधून येणाऱ्या स्वर-रंगांची मुक्त उधळणच श्रोते अनुभवत होते, त्यामुळे ते वाद्यच "सवाई'च्या पहिल्या दिवसाचे खास आकर्षण ठरले. 

परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरवात झाली ती सनईवादनाने. त्यानंतर देबाशिष भट्टाचार्य यांनी "चतुरंगी' (स्लाइड गिटार) या वाद्यावर आपला अनोखा कलाविष्कार सादर करून श्रोत्यांना त्यात गुंतवून टाकले. एकाच वाद्यातून विविध वाद्यांच्या स्वरांची अनुभूती देणारे हे वाद्य प्रथमच "सवाई'च्या मंचावर आले होते. "सवाई'तील बहुतांश श्रोतेही प्रथमच ते अनुभवत होते. भट्टाचार्य यांनी राग मधुवंती रंगवत "बाजे मुरलिया बाजे' या भजनाने भक्तिमय वातावरणाची निर्मिती करत वादनाची सांगता केली. वादन संपल्यानंतरही त्याचे स्वर मनामनांत घुमतच राहिले. 

कॅन्सरसारख्या आजारावर मात करून उभे राहिलेले मधुकर धुमाळ यांचे सनईवादनही तितकेच वैशिष्ट्यपूर्ण झाले. त्यांचे सनईवादन सुरू होताच मांडव श्रोत्यांच्या उपस्थितीने भरला. "भीमपलास'बरोबरच त्यांनी पहाडी धूनमधून श्रोत्यांवर मोहिनी घातली. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे काही काळ शिष्य राहिलेले आणि सध्या परदेशात वास्तव्य करत असलेले डॉ. विजय राजपूत यांचे गायन रंगले. त्यांची पिलू रागातील "मोरे कान्हा' ही होरी चांगलीच रंगली. "रघुवर तुम को मेरी' हे गुरूंचे भजन सादर करून त्यांनी गुरुभक्तीही दाखवली. 

पुढे पुरियाच्या भावपूर्ण स्वरांनी बनारस घराण्याचे गायक पं. राजन-साजन मिश्रा यांनी पूजा बांधली आणि "सवाई'चे वातावरण भक्तिमय झाले. त्यांच्या गायनातून तांत्रिक प्रभुत्व आणि मधुर आवाजाचा मिलाफ अनुभवायला मिळाला. विलंबित एक तालातील "ठोरे ठोरे दिन की' आणि "पिया संग लागी लगन' ही द्रुत एक तालातील बंदिश ऐकताना या बंधुद्वयाने रसिकांना जिंकले. कसदार गायकी काय असते, याचाच प्रत्यय करून दिला. "जगत मे झूठी देखी प्रीत' या भजनाचा अर्थ सांगत त्यांनी केलेले गायनही प्रभावी ठरले. त्यानंतर पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरीवादन झाले. "बिहाग'च्या मधुर स्वरांचा वर्षाव करत त्यांनी पहिल्या दिवसाची सांगता केली. 

मिळाली तानपुऱ्यांची "सोनेरी भेट' 
कर्नाटकातून आणलेले तुन (रेड सीडर) लाकूड, त्यावर अब्दुल करीम खॉं, सवाई गंधर्व, पं. भीमसेन जोशी यांच्या कोरलेल्या छबी, सोने वितळवून आणि फुलांपासून तयार केलेले रंग वापरून केलेली नक्षी... अशा मिरजकर बंधूंनी घडवलेल्या तानपुऱ्यांच्या चार जोड्या "आर्य संगीत प्रसारक मंडळा'ला मिरजकर बंधूंनीच बुधवारी भेट म्हणून दिल्या. या तानपुऱ्यांचा वापर करीतच "सवाई'तील आजच्या गायनाची सुरवात झाली. बाळासाहेब मिरजकर आणि त्यांचा नातू साजिद म्हणाले, ""हे तानपुरे तयार करण्यासाठी आम्ही वर्षभर मेहनत घेतली आहे. बारीक अभ्यास करून ते घडवले गेले आहेत.'' 

...आणि सनई पुन्हा वाजवली 
"""स्वदेस', "लगान' अशा अनेक चित्रपटांत मी वाजवलेली धून खूपच लोकप्रिय झाली; पण पुढे 2005 मध्ये कॅन्सरमुळे तोंडाची शस्त्रक्रिया झाली आणि डॉक्‍टरांनी सांगितले, "तुम्हाला यापुढे सनई वाजवता येणार नाही.' कॅन्सर बरा झाल्याचा आनंद होता; पण वाद्य वाजवता येणार नाही, याचे दुःख होते. तरीही सनई वाजविण्याचा खूप प्रयत्न केला; पण शस्त्रक्रियेमुळे एक गाल आत गेल्याने हवा वाद्यात शिरत नव्हती, ती बाहेर फेकली जात होती. मग मीच विचार केला. हवा बाहेर फेकली जाणार नाही, अशी सनई बनवली तर... ती मी बनवली आणि पुन्हा पूर्वीसारखे वादन करू लागलो. श्रोत्यांबरोबरच डॉक्‍टरांनाही सनई पुन्हा वाजवून दाखवली. आता अनेक चित्रपटांत, मैफलींत सध्या वादन करतोय,'' असे मनाला स्पर्शून जाणारे अनुभव 
मधुकर धुमाळ यांनी सांगितले, त्यामुळे त्यांच्या जिद्दीचे दर्शन झाले. 

मी तर प्राध्यापक-शिष्य 
डॉ. विजय राजपूत यांचे गायन सुरू असताना त्यांना साथ करण्यासाठी मागे चार- पाच कलाकार बसले होते, त्यापैकी एक व्यक्ती परदेशातील होती. लक्ष वेधून घेणारी ती व्यक्ती म्हणजे प्रा. एव्हीड क्‍लार्क. ते म्हणाले, ""मी मूळचा लंडनचा, तिथे विद्यापीठात मुलांना शिकवतो. पण, प्राध्यापक असलो तरी राजपूत यांच्याकडून संगीत शिकत आहे, त्यामुळे मी स्वतःला "प्राध्यापक- शिष्य' समजतो. मला "सवाई'सारख्या नावाजलेल्या व्यासपीठावर साथ करायला मिळाली, हे भाग्य समजतो.'' राजपूत म्हणाले, ""मी काही संगीताच्या घराण्यातला नाही; पं. भीमसेन जोशी यांच्या आशीर्वादामुळे गायन शिकता आले. त्यांच्याशी संवाद म्हणजे एकप्रकारची पीएच.डी.च होते. पुढे त्यांच्या सांगण्यावरून सवाई गंधर्व यांच्या कार्यावर पीएच.डी. केली.'' 

""पंडित भीमसेन जोशी यांनी शास्त्रीय संगीताचा एक "माहोल' पुण्यात तयार केला आहे. त्यांच्या स्वरलहरी आजही इथल्या वातावरणात गुंजत आहेत. त्यामुळे हे शहर आम्हाला तीर्थक्षेत्रासमान वाटते.'' 
- पं. राजन-साजन मिश्रा, गायक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com