...अन्‌ ज्येष्ठ झाले मुलांशी ‘कनेक्‍ट’!

सुवर्णा चव्हाण
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुणे - अमेरिकेत राहणाऱ्या मुलाशी रोजचा संवाद साधायला अनंत कुलकर्णी यांना रोज अडचणी यायच्या...मग, त्यांच्या मनात विचार आला की काय करावे, ज्यामुळे मुलाशी असलेला संवाद पुन्हा जुळू शकेल. कुलकर्णी यांना सोशल मीडियाची माहिती मिळाली. त्याबाबतचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर झाल्या आणि त्यांना मुलाशी व्हॉट्‌सॲप, फेसबुकद्वारे संवाद साधता आला. 

पुणे - अमेरिकेत राहणाऱ्या मुलाशी रोजचा संवाद साधायला अनंत कुलकर्णी यांना रोज अडचणी यायच्या...मग, त्यांच्या मनात विचार आला की काय करावे, ज्यामुळे मुलाशी असलेला संवाद पुन्हा जुळू शकेल. कुलकर्णी यांना सोशल मीडियाची माहिती मिळाली. त्याबाबतचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर झाल्या आणि त्यांना मुलाशी व्हॉट्‌सॲप, फेसबुकद्वारे संवाद साधता आला. 

ही किमया आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) सोशल मीडिया प्रशिक्षणवर्गाची. उतारवयात एकट्या पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना यामुळे आधार मिळाला आहे. सोशल मीडियाशी कनेक्‍ट होऊन त्यांना व्यक्त होण्याचे माध्यम मिळाले असून, फेसबुक नव्हे, तर इंस्टाग्रामवरही या प्रशिक्षणवर्गानंतर हजारो ज्येष्ठ नागरिक मुक्तपणे बोलू लागले आहेत.

सोशल मीडिया फक्त तरुणच योग्यप्रकारे हाताळू शकतात ही म्हण आता ज्येष्ठ नागरिकांनी खोडून काढली आहे. फेस्कॉमने दिलेल्या प्रशिक्षणानंतर आता ३० हजार ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. सोशल नेटवर्किंग साइट्‌सचा वापर कसा करावा? त्याचा फायदा काय? ई-मेल कसा पाठवावा? ई-बॅंकिंगचे फायदे काय? ऑनलाइन मोबाईल ई-बिल कसे भरावे? असे कित्येक प्रश्‍न ज्येष्ठांना भेडसावत होते; पण फेस्कॉमने सहा महिन्यांपूर्वी यावर मार्ग काढला आणि सोशल मीडियातज्ज्ञांकडून रीतसर ज्येष्ठांना प्रशिक्षण द्यायला सुरवात केली आणि आज त्यातून अनेक ज्येष्ठ सोशल मीडिया निर्भीडपणे वापरू लागले आहेत. 

फेस्कॉमच्या पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्रीराम बेडकीहाळ म्हणाले, ‘‘या प्रशिक्षणवर्गाला जनसेवा फाउंडेशन आणि जनता सहकारी बॅंकेचे सहकार्य लाभत आहे. ई-मेल कसा करावा यापासून ते ई-बॅंकिंग कसे करावे याबाबतची माहिती आम्ही देतो. हा वर्ग विनामूल्य असून, ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ यात प्रशिक्षण घेत आहेत. पुण्यात आतापर्यंत ५०० ज्येष्ठ नागरिकांना प्रशिक्षण दिले आहे. व्हॉट्‌सॲपपासून ते अगदी व्हिडिओ कॉलिंगपर्यंत ज्येष्ठ सोशल मीडियाचा वापर योग्यरीत्या करत आहेत. फेस्कॉमकडून ज्येष्ठ नागरिकांना संगणक प्रशिक्षणही देण्यात येते. ज्येष्ठांचा ओढा इंटरनेटकडे अधिक वाढला आहे. अगदी ऑनलाइन शॉपिंगही ज्येष्ठ सहजरीत्या करत आहेत.’’

सोशल मीडियामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिक एकमेकांशी जोडले गेलो आहोत. यातून परदेशात राहणाऱ्या मुलांशी संपर्क साधण्यासाठी ज्येष्ठांना सोशल मीडियाचे माध्यम मिळाले आहे. त्यांचे अनेक प्रश्‍न यातून सुटण्यास मदत झाली आहे. 
- उदय रेणूकर, ज्येष्ठ नागरिक