पुणेः सविंदण्याच्या सरपंचपदी वसंत पडवळ बिनविरोध

युनूस तांबोळी
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): सविंदणे (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वसंत गहिनाजी पडवळ, तर उपसरपंचपदी संतोष सदाशिव मिंडे यांची बिनविरोध निवड झाली. मिंडे यांची उपसरपंचपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): सविंदणे (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वसंत गहिनाजी पडवळ, तर उपसरपंचपदी संतोष सदाशिव मिंडे यांची बिनविरोध निवड झाली. मिंडे यांची उपसरपंचपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

सरपंच बाबाजी भिवाजी पडवळ व उपसरपंच संतोष सदाशिव मिंडे यांनी राजीनामा दिल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे या रिक्त पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी वसंत पडवळ, तर उपसरपंच पदासाठी संतोष मिंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी जी. ए. हुसेन यांनी सरपंचपदी वसंत पडवळ, तर उपसरपंचपदी संतोष मिंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. ग्रामविकास अधिकारी ए. ए. भागवत, कामगार तलाठी एल. एन. वाघमारे, टी. एम. गोसावी यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

सविंदणे गाव हे अतीदक्षता म्हणून पोलीस खात्याकडे नोंदणी असल्याने येथे अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता होती. गेली पंधरा दिवस येथे राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यामुळे शिरूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी बंदोबस्त वाढविला होता. येथील ग्रामपंचायत ला भेट देऊन निवडणुकी दरम्यान ग्रामस्थांना शांततेत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले. निवडणूक शांततेत होण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पालवे यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले, तर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.