'स्वातंत्र्याअभावी कलेचा श्‍वास घुसमटेल'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

पुणे - ‘‘दुर्गा’, ‘न्यूड’ यांसारख्या चित्रपटांपासून सेन्सॉर बोर्ड विचित्र पद्धतीने वागू लागले आहे. सत्तेच्या आवडीनिवडीनुसार हे निर्णय होत आहेत. स्वातंत्र्य नसेल, तर कलेचा श्‍वास घुसमटेल. इतिहास, कला, साहित्य, शिक्षण बदलण्याचा प्रकार हुकूमशाहीमध्ये होतो, सध्या तीच हुकूमशाही सुरू आहे’’, अशी टीका ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी रविवारी केली.

पुणे - ‘‘दुर्गा’, ‘न्यूड’ यांसारख्या चित्रपटांपासून सेन्सॉर बोर्ड विचित्र पद्धतीने वागू लागले आहे. सत्तेच्या आवडीनिवडीनुसार हे निर्णय होत आहेत. स्वातंत्र्य नसेल, तर कलेचा श्‍वास घुसमटेल. इतिहास, कला, साहित्य, शिक्षण बदलण्याचा प्रकार हुकूमशाहीमध्ये होतो, सध्या तीच हुकूमशाही सुरू आहे’’, अशी टीका ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी रविवारी केली.

स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजिला होता. या वेळी आरोग्य सेनेचे प्रमुख व महोत्सवाचे संयोजक डॉ. अभिजित वैद्य, दिग्दर्शक क्रांती रानडे व गगनविहारी बोराटे आदी उपस्थित होते. वैद्य यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आला.

वैद्य म्हणाले, ‘‘कोणतीही कला स्वातंत्र्यातच खुलते. कलाकारांनी समर्थ राहून ते स्वातंत्र्य जपले पाहिजे. मंत्री किंवा पंतप्रधानांवर टीका केली, तर लोकांवर बंधने घातली जात आहेत. हे संस्कृतीविरोधी आहे. संस्कृती केवळ वेदपुराण, रामायण, महाभारताद्वारे येत नसते. तर विविध प्रकारच्या कलांचीही जोपासना केली पाहिजे. आवश्‍यक गोष्टी दाबण्याचा प्रकार होत असून त्याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे.’’

डॉ. वैद्य म्हणाले, ‘निर्भय अभिव्यक्तीसाठी हे व्यासपीठ उपलब्ध आहे. चित्रपट निर्मिती ही महागडी प्रक्रिया मानू नये. मोबाईलद्वारेही चित्रपट करता येऊ शकतो. त्यासाठी पैसा नव्हे, तर प्रतिभा व अभिव्यक्तीची गरज असते.’’

रानडे म्हणाले, ‘‘जगामध्ये सध्या जाती-धर्मासंबंधीचे प्रश्‍न वाढत आहे. त्यावर चित्रपट बनविणे अवघड होत चालले आहे. मात्र, ते आव्हान तरुणांनी पेलण्याची आवश्‍यकता आहे. पुण्यातील स्थानिक प्रश्‍नांबाबत चित्रपट येणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही.’’

विविध चित्रपटांना पुरस्कार
फ्रान्सच्या ‘द ब्ल्यू गोल्ड ऑफ राजस्थान’ या माहितीपटाने तर ‘आफ्टरनून क्‍लाउड्‌स’ या लघुपटाने महोत्सवात प्रथम क्रमांक पटकाविला. माहितीपटामध्ये द्वितीय क्रमांक ‘हिमालयीन रिफ्युजी’, तर याच विभागासाठीचा उत्कृष्ट दिग्दर्शकाचा दर्पण बजाज यांनी ‘महाराजीन’साठी मिळविला. विशेष परीक्षक पुरस्कार ‘इन सर्च ऑफ इंडिगो’ आणि ‘अ बिस्ट कॉल्ड ब्युटी’ या माहितीपटाला दिला. लघुपटामध्ये द्वितीय क्रमांक ‘सो बी इट’ने (इटली) पटकाविला, तर ‘कश्‍मीर’ या लघुपटासाठी सुगंधा गर्ग यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. ‘मारीसोल १९९८’ आणि ‘द विक्‍युलिअर ॲबिलिटज’ या लघुपटांना परीक्षकांचा पुरस्कार मिळाला.

Web Title: pune news Smita Patil International Film Festival bhai vaidya Censor board