दस्त नोंदणीतील अडथळा दूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे - कर्वेनगर येथील सह दुय्यम निबंधक (हवेली 13) कार्यालयाच्या कनेक्‍टिव्हिटीचा प्रश्‍न आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणेत सुधारणा झाल्याने दस्त नोंदणीतील मोठा अडसर दूर झाला आहे. या कार्यालयाला पुरविलेल्या बीएसएनएलच्या कनेक्‍टिव्हिटीतील समस्येमुळे येथे दिवसभरात कसेबसे दहा- पंधरा दस्त नोंदविले जात. मात्र, दुरुस्तीनंतर दिवसाकाठी 40-50 दस्त नोंदविणे शक्‍य होऊ लागले आहे, असे येथील दुय्यम निबंधक पोपटराव भोई यांनी सांगितले. "सकाळ'ने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्वेनगर येथील काकडे प्लाझा या व्यापारी संकुलामध्ये "हवेली 13' हे सह दुय्यम निबंधकांचे कार्यालय आहे. याला "बीएसएनएल'ने एमपीएलव्हीपीएन कनेक्‍टिव्हिटी पुरविली होती; परंतु ती वारंवार खंडित होत असल्याने सप्टेंबर महिन्यात तर अनेक दिवस येथील कामकाज ठप्प होते. "सकाळ'ने याकडे लक्ष वेधताच बीएसएनएलने येथील यंत्रणा फायबर ऑप्टिक केबलने जोडून दिली. त्यामुळे या यंत्रणेच्या वेगात लक्षणीय वाढ झाली. तथापि, जुनाट यंत्रणेमुळे काही तासांतच पुन्हा तिचा वेग मंदावला. परिणामी, येथील अधिकारी व व्यावसायिकांनी पुन्हा एकदा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना साकडे घालण्यास सुरवात केली. परंतु, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने येथील अधिकाऱ्यांनी पुन्हा प्रसिद्धी माध्यमांकडे जाण्याचा इशारा दिला. ही मात्रा लागू पडली आणि त्यांनी येथील एमयूएक्‍स यंत्रणा बदलून दिली. ही यंत्रणा बदलताच अपेक्षित वेगाने दस्त नोंदणीचे काम सुरू झाले, असेही भोई यांनी सांगितले.