दहा टक्के अन्नपदार्थ अप्रमाणित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

सणासुदीच्या दिवसांमध्ये घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल आता मिळत आहेत. त्यातून तेल आणि दूध यांचे सर्वाधिक नमुने अप्रमाणित आल्याचे दिसून येत आहे. अप्रमाणित म्हणजे ते आरोग्यास घातक असा अर्थ होत नाही. कायद्याप्रमाणे दिलेल्या मानकांमध्ये हे प्रमाण नसते. त्याच प्रमाणात उत्पादकाला दंड केला जातो.
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

पुणे - गणेशोत्सव ते दिवाळीदरम्यान अप्रमाणित तेलाबरोबरच दूध आणि दुग्धजन्य पदार्थही पुणेकरांपर्यंत पोचण्याचा धोका होता. बाजारात विक्रीसाठी येण्यापूर्वीच केलेल्या कारवाईमुळे पुणेकरांचे सण आनंदात पार पडल्याचे दिसते. या दरम्यान केलेल्या कारवाईत सुमारे दहा टक्के अन्नपदार्थ अप्रमाणित असल्याचे दिसून आले आहे. 

सणासुदीच्या दिवसांमध्ये तेलापासून ते साखरेपर्यंत आणि मिठाईपासून ते पनीर, दही, बासुंदीपर्यंत विविध पदार्थांची पुण्यात मागणी वाढते. हे पदार्थ ग्राहकांपर्यंत पोचण्यापूर्वीच त्यांची गुणवत्ता तपासण्याची विशेष मोहीम अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) राबविण्यात आली. या अन्नपदार्थांचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेला देण्यात आले होते. या अहवालाच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. 

पंधरा पदार्थांची तपासणी
गणपतीपासून ते दिवाळीपर्यंतच्या विविध सणांमध्ये पुण्यात दुधाबरोबरच मैदा, पनीर अशा पदार्थांची मागणी प्रचंड वाढते. दिवाळीचे वेगवेगळे खमंग पदार्थ तळण्यासाठी तेलाची मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून खरेदी होते. या सणासुदीच्या दिवसांमध्ये मागणी वाढणाऱ्या पदार्थांची देशभरातून पुण्यात आवक वाढते. त्यापैकी वेगवेगळ्या १५ पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले. प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून पुण्यातील बाजारपेठेत तेल, दूध, पनीर, दही, बासुंदी, क्रीम असे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. पण हा माल बाजारपेठेत वितरित करण्यापूर्वीच तपासण्यात आल्याने तो विक्रीसाठी प्रतिबंधित करण्यात आला होता. त्यामुळे पुणेकरांना सुरक्षित अन्न पदार्थ मिळाल्याचा दावा ‘एफडीए’तर्फे करण्यात आला आहे. 

एकूण ३८७ नमुने 
शहरात येणाऱ्या वेगवेगळ्या पंधरा पदार्थांचे मिळून ३८७ नमुने काढले होते. त्यापैकी २५८ नमुने 
प्रमाणित असल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. तर ३९ (सुमारे १० टक्के) नमुने 
अप्रमाणित असल्याचेही या अहवालातून अधोरेखित झाले आहे. 

दूध, तेल सर्वाधिक अप्रमाणित 
शहरातील दुधाची मागणी मोठी असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या जवळच्या जिल्ह्यांसह नाशिक, उस्मानाबाद येथून शहरात दूधपुरवठा होतो. शहरात येणाऱ्या या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून ५५ नमुने घेतले होते. त्यापैकी ३८ नमुने प्रमाणित आले, तर १४ नमुने अप्रमाणित होते. उर्वरित सहा नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्या खालोखाल ११ तेलाचे नमुने अप्रमाणित असल्याची माहिती पुढे आली आहे. खवा, मावा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ याचे काही नमुने अप्रमाणित आहेत.

Web Title: pune news Ten percent of food products are uncertain