अर्धा किलो सोन्यावर डल्ला 

अर्धा किलो सोन्यावर डल्ला 

पुणे - रविवार पेठेतील सराफाच्या दुकानावर भर दिवसा दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी सराफाला कोयत्याचा धाक दाखवून अर्धा किलो सोने आणि रोख 30 हजार रुपयांची रक्कम लुटली. या परिसरातील "सीसीटीव्ही' चित्रीकरणाच्या माध्यमातून दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. 

याप्रकरणी मनोज जैन या सराफाने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली आहे. जैन हे मुंबई येथून सोने आणून पुण्यातील सराफी बाजारात त्याची विक्री करण्याचा भागीदारीत व्यवसाय करीत आहेत. रविवार पेठेतील रेल्वे आरक्षण केंद्रासमोर असलेल्या गल्लीत नंदन टेरेस या इमारतीमध्ये जैन यांचे दुकान आहे. बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांच्या दुकानात चार ते पाच जण घुसले. त्यांचे अंदाजे वय 20 ते 25 वर्षे होते. जैन आणि त्यांचा कामगार दुकानात होते. त्या वेळी रेल्वे आरक्षण केंद्रासमोरील गल्लीतून आलेल्या दरोडेखोरांनी जैन आणि त्यांच्या कामगाराला कोयत्याचा धाक दाखवला. दुकानातील अर्धा किलो सोने आणि 30 हजारांची रोकड, असा ऐवज लुटला अन्‌ ते पसार झाले. या धावपळीत त्यांनी धमकावण्यासाठी वापरलेले कोयते ते दुकानात टाकून दिले. जैन यांच्या कामगारांनी त्यांचा पाठलाग केला. पण, ते गल्लीतून रविवार पेठेतील वज्रदेही चौकाच्या दिशेने पसार झाले. 

या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख, फरासखाना ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. गुन्हे शाखेकडून श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्‍वान पथकाने दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या माध्यमातून तपास करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com