द्रुतगती महामार्गावर "थ्राय बीम क्रॅश बॅरिअर' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पुणे  -अपघातांमध्ये गाड्यांचे नुकसान आणि जीवितहानी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर बनविलेल्या "थ्राय बीम क्रॅश बॅरिअर' पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बसविण्यात येणार आहे. परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) संपूर्ण महामार्गाच्या दुतर्फा हे "बॅरिअर' बसविण्यात येतील. 

पुणे  -अपघातांमध्ये गाड्यांचे नुकसान आणि जीवितहानी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर बनविलेल्या "थ्राय बीम क्रॅश बॅरिअर' पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बसविण्यात येणार आहे. परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) संपूर्ण महामार्गाच्या दुतर्फा हे "बॅरिअर' बसविण्यात येतील. 

""अपघातांमध्ये वाहनांचे कमी नुकसान व्हावे, जीवितहानी कमी व्हावी तसेच वेगवान गाड्या एका बाजूच्या रस्त्यावरून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर जाऊन होणारे अपघात रोखण्यासाठी संरक्षक उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये वापरात असलेली "थ्राय बीम क्रॅश बॅरिअर' बसविण्यात येणार आहे. "वॉलमाउंट इंडिया लिमिटेड' ही कंपनी हे काम करणार आहे. सुमारे 94 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा आणि मध्यभागी दुभाजकाच्या कडेला 2 फूट उंचीचे बॅरिअर असेल. यासाठी एकूण 66 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. रात्रीच्या वेळी हे बॅरिअर चमकतात. त्यामुळे यावर "रेडियम' लावण्याची गरज असणार नाही. पुणे ते मुंबई महामार्गालगतच्या 22 ठिकाणी गावांना जोडणारे रस्ते (कनेक्‍टर) खुले असतील. या खुल्या जागा आणि टोल नाके परिसरामध्ये काही अंतरावर हे बॅरिअर बसविण्यात येणार नाहीत. परदेशातील रस्त्यांच्या कडेला अशा प्रकारचे उच्च प्रतीच्या धातूंचे बॅरिअर बसविल्यामुळे अपघातामध्ये गाड्यांचे नुकसान कमी झाले आहे. घाटामध्येदेखील याचा फायदा होईल. जमिनीमध्ये "ड्रिल' करून हे बॅरिअर बसविल्यामुळे ते मजबूत असणार आहेत,'' अशी माहिती "एमएसआरडी'चे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी दिली. 

प्रस्तावित कुसगाव-खालापूर मार्गाला "इन्फ्रा'मध्ये मंजुरी ! 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित केलेल्या कुसगाव-खालापूर रस्त्यांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) राज्य सरकारच्या "इन्फ्रा' समितीमध्ये मंजुरी मिळाली आहे; परंतु पर्यावरण व वन विभागाचे "ना हरकत प्रमाणपत्र' मिळविण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू केले जाणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.