प्रयोगशीलतेतून बैठ्या शौचालयांना नवे रूप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणाऱ्यांची संख्या देशात मोठी असल्याचे मी केलेल्या सर्वेक्षणात निदर्शनात आले. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्‌भवत असल्याचेही दिसून आले. या टॉयलेटची उंची वाढवून नवीन प्रयोग केला. याद्वारे टॉयलेटमध्ये कसे बसावे, याची योग्य पद्धत लोकांना कळेल. मी अनेक तज्ज्ञांना हा प्रकल्प दाखवला आहे. या प्रकल्पासाठी मला जर्मनीचा पुरस्कारही मिळाला आहे. हा प्रकल्प फेब्रुवारीपासून गावागावांमध्ये पोचविणार असून त्याच्या पेटंटसाठी अर्जही केला आहे.’’ 
- सत्यजित मित्तल, प्रॉडक्‍ट डिझायनर

पुणे - भारतीय बैठकीच्या शौचालयाचा वापर आजही देशात ठिकठिकाणी होतो; पण त्यातील बैठ्या व्यवस्थेमुळे लोकांना पाठ आणि पाय दुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. यावर उपाय म्हणून प्रॉडक्‍ट डिझायनर असलेल्या सत्यजित मित्तल या पुण्यातील तरुणाने या शौचालयामध्ये काही नावीन्यपूर्ण बदल केले आहेत. ‘स्क्वॉटइझ’ हे नवीन प्रकारचे टॉयलेट त्याने तयार केले असून त्याने या शौचालयाची उंची वाढविली आहे. त्यामुळे शरीराचे संपूर्ण वजन पायांवर येत नसल्याने पाय आणि पाठीच्या दुखापतीला आराम मिळणार आहे. या नव्या प्रयोगामुळे भारतीय बैठकीच्या शौचालयांना आता नवे रूप मिळाले आहे.

जागतिक शौचालय दिनानिमित्त सत्यजितने ‘सकाळ’शी संवाद साधला. ‘एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’मध्ये शिकत असताना सत्यजितने हा प्रकल्प तयार केला होता. भारतीय बैठकीच्या शौचालयांचा अभ्यास करून त्याने हा प्रकल्प बनवला आहे. या स्टार्टअपच्या प्रकल्पाला पुण्यातील ‘सायन्स ॲण्ड टेक्‍नॉलॉजी पार्क’चे अनुदान मिळाले आहे. गावोगावी आणि शहरांमध्ये येत्या काही काळांमध्ये या प्रकारचे टॉयलेट बसवून देण्याचे त्याचे नियोजन आहे. भारतीय बैठकीच्या शौचालयात बसताना माणसाच्या पायावर वजन येते;  त्यामुळे कालांतराने त्यांना अनेक शारीरिक त्रास उद्‌भवतात. या टॉयलेटची उंची वाढविल्याने त्याचा परिणाम पाठीवर आणि पायाला होत नाही. आम्ही फायबरने टॉयलेटची काही उंची वाढविली असून, त्याद्वारे  शरीराचे वजन पायांवर पडत नसल्याचे सत्यजितने सांगितले. 

तो म्हणाला, ‘‘भारतीय बैठकीच्या टॉयलेटला आणखी चांगले बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. भारतीय बैठकीचे शौचालय आकाराने सपाट असतो. त्यामुळे एखादा व्यक्ती जेव्हा टॉयलेटमध्ये बसतो. तेव्हा त्याला अनेक अडचणी येतात. त्यामुळे शरीराचे संपूर्ण वजन पायांवरील तळव्यांवर पडल्याने अनेक समस्या उद्‌भवतात. त्यावर उपाय म्हणून भारतीय बैठकीच्या टॉयलेटमध्ये बदल करून मी हा प्रकल्प तयार केला. त्याचे व्यवस्थापन करणेही सोपे आहे. येत्या काळात देशातील दवाखाने, रेल्वे आणि कार्यालयांमध्येही अशी टॉयलेट बसविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’

Web Title: pune news toilets Satyajit Mittal