फेरीवाल्यांना व्यापाऱ्यांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

शहरातील मुख्य बाजारपेठ लक्ष्मी रस्त्यावर आहे. येथील व्यापाऱ्यांना अधिक चांगल्या सेवा- सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, ती पार पाडण्याऐवजी महापालिका प्रशासन व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्याची योजना आखत आहे. येथील फेरीवाल्यांचे त्याच ठिकाणी, म्हणजे पार्किंगच्या जागेत पुनर्वसन करणे चुकीचे आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि व्यापाऱ्यांचे हाल होणार आहेत. त्यामुळे ही योजना राबवू नये. ती राबविण्याचा प्रयत्न केल्यास आक्रमक भूमिका घेऊ. 
- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, पुणे 

पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांचे या रस्त्यावरील पार्किंगच्या जागेत पुनर्वसन करण्याच्या महापालिकेच्या योजनेला येथील व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. येथील बेकायदा फेरीवाले, पथारी व्यावसायिकांना शोधा, त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवा, मगच नवी योजना आणून त्यांचे पुनर्वसन करा, असा सल्ला देत या योजनेविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी शनिवारी दिला. त्यामुळे महापालिकेला पुनर्वसनाची नवी योजना अंमलबजावणीआधीच गुंडाळावी लागण्याची शक्‍यता आहे. 

या रस्त्यालगतच्या पदपथावरील अधिकृत फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांचे दुचाकी पार्किंगच्या जागेत पुनर्वसन करण्याची योजना महापालिका प्रशासनाने आखली आहे. या योजनेंतर्गत जवळपास शंभर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन असून, त्यात प्रत्येक व्यावसायिकाला चार बाय पाच फूट इतकी जागा देण्यात येणार आहे. या योजनेमुळे पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे होतील. शिवाय, फेरीवाल्यांचे तेथे पुनर्वसन होणार असल्याचे महापालिका अतिक्रमण विभागाचे म्हणणे आहे. परंतु, पार्किंगच्या जागेत पुनर्वसन होणार असल्याने वाहतूक विस्कळित होऊन पादचारी आणि वाहनचालकांना फटका बसेल. तसेच, येथील व्यापारी आणि फेरीवाल्यांमध्ये वादाच्या घटना घडण्याची शक्‍यता असल्याने या योजनेला व्यापाऱ्यांनी विरोध 
केला आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करू नये, अशी त्यांची भूमिका आहे. 
या संदर्भात व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेणार असून, बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप म्हणाले, "फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याची योजना आहे. मात्र, ती अमलात आणण्याआधी सर्व घटकांशी चर्चा केली जाणार आहे. त्या ठिकाणी कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मुळात 
ही योजना तात्पुरत्या स्वरूपाची आहे. त्यातील अडचणी जाणून बदल केले जातील.'' 