धुवांधार पावसाचा वाहतुकीला फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

पुणे - शहरात बुधवारी सायंकाळी झालेल्या धुवांधार पावसाचा फटका वाहतुकीला बसला. प्रमुख रस्त्यांसह अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही कोंडी फुटली नव्हती. कार्यालये सुटण्याच्या वेळेत पाऊस आल्याने अनेकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.

गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्ता, महात्मा फुले मंडई परिसर, शिवाजीनगर, सातारा रस्ता, लुल्लानगर, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), येरवड्याचा परिसर आदी सर्वच भागांत वाहतूक कोंडी झाली होती.
पावसामुळे काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने कोंडीत आणखीच भर पडली होती. रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीचा वेगही कमी झाला होता. कोंडीतून हळूहळू वाहने पुढे सरकत होती. पुढे जाण्यासाठी प्रत्येकजण घाई करत असल्यामुळे अनेक चौकांत वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच पौड रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

काही ठिकाणी पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत हीच परिस्थिती होती. अनेक नागरिकांनी या संदर्भात "सकाळ' कार्यालयात दूरध्वनी करून वाहतूक कोंडीबद्दलची माहिती देत नाराजी व्यक्त केली. सायंकाळी उशिरा ही कोंडी फुटली.