बदल्यांच्या ‘रॅकेट’ची पाळेमुळे शोधा

बदल्यांच्या ‘रॅकेट’ची पाळेमुळे शोधा

मुंबईच्या गुन्हे शाखेने आयएएस, आयपीएस आणि बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देणाऱ्या रॅकेटचा नुकताच पर्दाफाश केला. विशेष म्हणजे यापूर्वी पुणे शहर गुन्हे शाखेने या रॅकेटमधील विशाल ओंबाळे याला अटक केली होती. त्‍याचे मंत्रालय आणि पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. या घटनेवरून नुकत्याच झालेल्या काही बदल्याही संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. या प्रकरणाची ‘सीआयडी’ चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.  
 

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करणाऱ्या रॅकेटमधील चौघांना विलेपार्ले येथील पंचतारांकित हॉटेलमधून नुकतीच अटक केली. महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखे, सोलापूर येथील किशोर माळी, पुण्यातील विशाल ओंबाळे आणि नवी दिल्लीचा रवींद्र यादव ही ती चौकडी. पोलिसांनी या चौघांच्या ताब्यातून दहा कोटी रुपयांचे धनादेश, साडेसहा लाखांची रोकड आणि रबरी शिक्‍क्‍यांसह महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. मुंबई-पुण्यासह राज्यातील पोलिस दलातील अधिकाऱ्यांना ‘क्रीम पोस्टिंग’साठी वरिष्ठांना दलालांमार्फत ‘मलिदा’ द्यावा लागत असल्याची चर्चा आहे. सोलापूर येथील एका पोलिस उपायुक्‍ताला यासाठी भेटण्याचा निरोपही मिळाला. या प्रामाणिक अधिकाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

तपासादरम्यान, या चौकडीने गेल्या सात-आठ वर्षांत काही सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठी ‘माया’ गोळा केली आहे. त्यांच्या ताब्यातून केंद्रीय दक्षता समिती, सेन्सॉर बोर्डचा सदस्य असल्याचे ओळखपत्र जप्त करण्यात आले. त्यांच्या भोवती बाऊन्सरचे सुरक्षा कडे, लाल दिव्याची आलिशान गाडी आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य. शिवाय, बॉलिवूडमधील अभिनेते आणि मॉडेलसोबत त्यांचे संबंध असल्याचे समोर आले आहेत. गृह विभाग आणि पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याची चर्चा आहे. तसेच गुन्हे शाखेतील एका कर्मचाऱ्याचे ओंबाळे याच्यासमवेत संबंध  असून, तो त्याच्यासोबत पबमध्येही गेल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे ओंबाळे याला यापूर्वी पुणे शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्‍त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली होती. पोलिस हवालदार शैलेश जगताप यांना मिळालेल्या माहितीवरून युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्या वेळी तपासादरम्यान धक्‍कादायक बाबी उघडकीस आल्या होत्या.

ओंबाळे याचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच ही टोळी पुन्हा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकली. मात्र या टोळीचे ‘पुणे कनेक्‍शन’ जुने आहे. त्याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. त्या वेळी युनिट दोनच्या पथकाने ओंबाळे याचा पासपोर्ट जप्त केला होता. तो पासपोर्ट मिळविण्यासाठी त्याने शहर पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर या संपूर्ण बदल्यांच्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे, असे मत काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी व्यक्‍त करीत आहेत.

तपास अद्याप गुलदस्तात
विशाल ओंबाळे याने डान्सबार, महागड्या गाड्यांची खरेदी, सोन्याचे दागिने, मुंबई-पुणे आणि दिल्लीमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य, विमानप्रवास, आलिशान कार्यालय यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर, खडकी, विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, स्वारगेट तसेच पनवेलजवळ कळंबोली पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात त्याला अटकही झाली. मात्र त्याचा तपास कुठेपर्यंत पोचला, हे अद्याप गुलदस्तात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com