लेखक विकसित व्हायला हवा - सतीश आळेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणे - ‘‘नव्वदनंतर, आर्थिक उदारीकरण झाल्यानंतर जेव्हा रंगभूमीच्या गरजा बदलल्या, त्याचा ‘फॉम’ बदलला, लोकांच्या जगण्याची पद्धत बदलली... या सगळ्या संवेदनांना सामोरे कसे जावे, अशा पद्धतीचा लेखक कसा विकसित करता येईल, यावर विचार झाला पाहिजे,’’ असे मत नाटककार सतीश आळेकर यांनी बुधवारी व्यक्त केले. कार्यशाळेमुळे कलाकार जन्माला येत नाही; पण त्याच्या प्रतिभेला नवे आयाम मिळू शकतात, त्याला रंगभान मिळू शकते, असेही ते म्हणाले.

साहित्य- रंगभूमी प्रतिष्ठान आणि निखिल राणे फाउंडेशन यांच्या वतीने ‘रंगभान २०१७’ ही नाट्यलेखन प्रयोगशाळा आयोजित केली आहे. ती ऑगस्टपासून पुण्यात सुरू होणार असून याबाबत आळेकर, लेखक किरण यज्ञोपवीत, अशोक कुलकर्णी, अश्‍विनी राणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, त्यानंतर आळेकर बोलत होते.

आळेकर म्हणाले, ‘‘नाट्यलेखन कार्यशाळेचा मराठी रंगभूमीला नेहमीच फायदा झालेला आहे. १९७२मध्ये पं. सत्यदेव दुबे यांनी कार्यशाळा घेतली होती. त्यात माझ्यासह महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, दिलीप जगताप, सुहास तांबे असे अनेक नाटककार विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते. त्यानंतर ‘थिएटर ॲकॅडमी’ने १९८५ ते ८७ दरम्यान घेतलेल्या कार्यशाळेत मकरंद साठे, प्रेमानंद गज्वी, अतुल पेठे, अजित दळवी, जयंत पवार, प्रशांत दळवी, श्रीरंग गोडबोले हे त्यावेळचे तरुण सहभागी झाले होते. ही नावे पाहिल्यानंतर कार्यशाळा ही स्वत:ला घडवण्याची एक संधी आहे, हे लक्षात येऊ शकते.’’

रंगभूमीच्या इतिहासाचा धांडोळा घेतला, तर मराठी रंगभूमी ही नाटककारप्रधान आहे, हे लक्षात येईल. हे जसे रंगभूमीचे वैशिष्ट्य ठरले आहे, तसे गेल्या ३०-४० वर्षांत हीच गोष्ट रंगभूमीची मर्यादाही ठरलेली आहे. रंगभूमीला अनेक आयाम असतात, नाटककार हा त्याचा एक भाग आहे. नाटक हे अनेकांनी मिळून करण्याचे माध्यम आहे
- सतीश आळेकर, नाटककार