उद्योजक घडविण्यासाठी ‘यिन’चा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - तरुण उद्योजक घडविण्यासाठी, करिअरची नवी संधी उपलब्ध व्हावी आणि व्यावसायिक जीवनाला नवे वळण मिळावे, यासाठी महाविद्यालयाच्या स्तरावरच चांगल्या मार्गदर्शकाची गरज भासते. ती मिळाली, तर पुढची वाटचाल यशाकडे जाते. त्यासाठीच ‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.  

पुणे - तरुण उद्योजक घडविण्यासाठी, करिअरची नवी संधी उपलब्ध व्हावी आणि व्यावसायिक जीवनाला नवे वळण मिळावे, यासाठी महाविद्यालयाच्या स्तरावरच चांगल्या मार्गदर्शकाची गरज भासते. ती मिळाली, तर पुढची वाटचाल यशाकडे जाते. त्यासाठीच ‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.  

सकाळ माध्यम समूहाच्या ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’ (एसआयएलसी) आणि ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुण उद्योजक घडविण्यासाठी बारा महिने कालावधीचा ‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ हा अभ्यासक्रम ऑक्‍टोबरमध्ये सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी एच. व्ही. देसाई महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभ्यासक्रमासंदर्भातील डिजिटल सादरीकरण या वेळी करण्यात आले. 

सोळा पानी नियतकालिकाच्या स्वरूपात ‘ऑनलाइन’ आणि ‘ऑफलाइन’ अशा दोन्ही पद्धतीने हा अभ्यासक्रम करता येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले. अनेक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची तयारीही या वेळी दर्शविली. या अभ्यासक्रमात उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने आवश्‍यक सर्व माहिती, यशकथा, यशस्वी उद्योजकांचे अनुभव, ऑनलाइन चॅट, व्हिडीओ लेक्‍चर, याचा समावेश असल्याने याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता जागृत झाली आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने अभ्यासक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, प्राध्यापक डॉ. महावीर सांकला, डॉ. प्रभाकर घोडके, एसआयएलसीच्या राजश्री लिमण आदी उपस्थित होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र महाविद्यालयात (बीएमसीसी) प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राचार्य डॉ. दिलीप सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामुळे प्रभावित झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे येत अभ्यासक्रमात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य असे, की प्रशिक्षण पद्धतीसाठी ‘लॉगिन आयडी’ची सुविधा देण्यात येईल. त्या माध्यमातून हव्या त्या वेळी प्रशिक्षण घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

अभ्यासक्रमाची रचना दोन टप्प्यांत विभागण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणार्थींना व्हिडीओ, ऑडिओ आणि लिखित स्वरूपात प्रशिक्षण दिले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात उद्योजकतेची सुरवात म्हणून ‘स्टार्टअप कॉम्पिटिशन’ म्हणजेच विशेष स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेत विजेत्या प्रशिक्षणार्थींच्या उद्योजक संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी साह्य केले जाणार आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम विकसित केला आहे.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपक्रमाची माहिती घेत, यामध्ये सहभागी होऊन प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शविली आहे. तरुणांना करिअरच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. 

करिअरच्या नव्या संधीच्या दिशेने जाण्याचा मार्ग म्हणून मी या अभ्यासक्रमाकडे पाहते. ‘एसआयएलसी’ आणि ‘यिन’ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे मला प्रेरणा मिळाली आहे. उद्योजक बनण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
- मेघा शिरसाठ 

हा अभ्यासक्रम निश्‍चितच स्वागतार्ह आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे जाण्याची संधी उपलब्ध होईल. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिकांवर आधारित ज्ञानावर भर दिला जाणे, हे मला महत्त्वाचे वाटते.
- शिवानी चौहान

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शकाची गरज असते. ती या अभ्यासक्रमातून पूर्ण होऊ शकेल. अभ्यासक्रमातील घटकांचा विचार केला, तर आम्ही पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरेल.
- रोहित ढुमे, समृद्धी जांभळे