'व्हिजनसोबत काम करण्याची ताकद असल्यास यश!'

'व्हिजनसोबत काम करण्याची ताकद असल्यास यश!'

पुणे - ‘‘नवनिर्मिती आणि नव्या प्रवाहामुळे तंत्रज्ञानाने प्रगतीचे शिखर गाठले आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी आणि नवउद्योजकांनी सतत बदलत्या प्रवाहनुसार नवनिर्मितीचा विचार करावा. व्हिजन आणि काम करण्याची ताकद असेल, तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी एक प्रभावी मनुष्यबळ, नवसंकल्पना आणि नवऊर्जेची निर्मिती करून उद्योग क्षेत्रात उतरा,’’ असे आवाहन ‘सिम्बा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विटो मार्गिटो आणि ‘हेड ऑफ ग्रोथ’ अल्बर्टो आयोरे यांनी सोमवारी केले. 

‘सकाळ’च्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’ व्यासपीठाने आयोजिलेल्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’मध्ये मार्गिटो आणि आयोरे बोलत होते. ‘स्टार्टअप्स- द नेक्‍स्ट बिग थिंग’ या विषयावर दोघांनी तरुणाईशी संवाद साधला. ‘यिन’चे प्रमुख तेजस गुजराथी या वेळी उपस्थित होते. 

‘गुगल’चे माजी कर्मचारी ते एका कंपनीच्या हेड ऑफ ग्रोथ पदापर्यंतचा प्रवास अल्बर्टो यांनी उलगडला. अल्बर्टो म्हणाले, ‘‘आपण काय निर्णय घेतो, यावर आपले आयुष्य अवलंबून असते. म्हणूनच आपली निर्णय क्षमता तेवढ्याच ताकदीची असायला हवी. आपल्यात काहीतरी वेगळे दडलेय, या विचारानेच मला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणले. आपण भविष्याचा विचार करण्यापेक्षा आपण काय आहोत आणि काय करू शकतो, याचा विचार करावा. ज्याला नवनिर्मितीचा ध्यास असतो, त्याला यश मिळतेच असा आत्मविश्‍वास स्वतःमध्ये निर्माण करा. ‘गुगल’ने मला नावीन्याकडे कसे बघावे आणि तंत्रज्ञानातील नवीन बदल यांची ओळख करून दिली. त्यानंतर स्टार्टअपच्या दृष्टीने छोट्या उद्योजकांसाठी काहीतरी करावे, असा विचार मनात आला आणि ‘सिंबा’ची निर्मिती झाली. व्यवसायासाठी काम न करता लोकांसाठी काम करण्यावर भर द्यावा. आपल्या उद्योगासाठी तेवढ्याच ताकदीचे कर्मचारी आपण शोधले पाहिजेत. लहान पर्यायांपासून स्टार्टअपची सुरवात करावी. ऑनलाइन प्रेझेंन्स, समर्पक संवाद कौशल्य, अंतर्गत व्यवस्थापन आणि मोबाईल की सर्व्हिसचा चांगला वापर केला तर यश मिळू शकते.’’

विटो म्हणाले, ‘‘करिअरच्या वाटा निवडताना पॅशनची गरज असतेच. स्टार्टअपच्या दृष्टीने मोठ्या पर्यायांचा विचार करण्यापेक्षा लहान पर्यायांपासून सुरवात करावी. आपण आपल्या संकल्पनांच्या प्रेमात न पडता त्या लोकांपर्यंत कशा पोचवता येतील, याचा विचार केला पाहिजे. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील, तर स्टार्टअपला यश मिळेलच. आपल्यात पॅशन नसेल, तर आपल्या संकल्पनांना यश मिळू शकत नाही. आज ई-कॉमर्स कंपन्यांनीही स्वबळावर यश मिळवले आहे. त्यामुळे यशाचा विचार करताना कंपनीच्या नियोजनाकडे भर द्यावा. छोट्या-छोट्या गोष्टीतूनच यश मिळते.’’ 

...तर भारत प्रत्येक देशाला मागे टाकेल 
‘‘एक मोबाईल किती बदल घडवू शकतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. कंपनीच्या प्रसिद्धीपासून ते छोट्या उद्योजकांना जोडण्याचे कामही मोबाईल उत्तम प्रकारे करू शकतो. त्यासाठी नवउद्योजकांना संधी मिळावी, यासाठी ‘ब्रिंग महाराष्ट्र ऑनलाइन’ ही संकल्पना राबविली जात आहे. छोट्या व्यावसायिकांना एकमेकांशी आणि बाजारपेठांशी जोडण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे. अशाच पद्धतीने डिजिटल माध्यमाचा भारतात वापर वाढला, तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भारत हा प्रत्येक देशाला मागे टाकेल,’’ असे अल्बर्टो आयोरे यांनी सांगितले.

कामाची रचना ठरवा
कामाच्या ठिकाणी योग्य यंत्रणा उभारली की कामे अधिक तत्परतेने आणि अचूकपणे पूर्ण होतात. अशा यंत्रणेमुळे कर्मचारी, काम आणि तुमचे वैयक्तिक आयुष्य यांचा ताळमेळ साधणे सहज शक्‍य होते. त्यामुळे कोणताही उद्योग सुरू करताना तरुणांनी आपल्या कामाची एक रचना ठरवावी. सध्या युवकांसाठी रोजगाराची मोठी समस्या भेडसावत आहे. केवळ महाविद्यालयीन शिक्षणातून मिळालेले ज्ञान फारसे उपयोगी ठरत नाही. प्रत्यक्ष काम करताना तुम्ही किती अचूकपणे, प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन काम करता हे महत्त्वाचे असते. तरुणांसाठी रोजगारनिर्मितीसोबतच सक्षमीकरणही आवश्‍यक असते. याबाबतही राजकारणाच्या माध्यमातून विविध कामे करणार आहे.
- रोहित पवार,कार्यकारी संचालक, बारामती ॲग्रो लिमिटेड

उद्योजकता संस्कृती रुजावी
रोजगाराची पुरेशी उपलब्धता नसणे हा देशापुढील सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे. आगामी काळात हा प्रश्‍न अधिक बिकट होईल. त्यामुळे नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तरुणांनी व्यवसायाकडे लक्ष द्यावे. उद्योजकतेसाठी तरुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी समाजात ‘उद्योजकता’ संस्कृती रुजविणे आवश्‍यक आहे. तरुणांनी देशातील समस्यांना संधी मानून त्यापैकी कोणतीही एक समस्या सोडविण्यासाठी मदत होईल, असे उद्योग विकसित करावेत. एखाद्या उद्योगाची सुरवात केल्यावर तो यशस्वी होईलच असे नाही; परंतु याचा अर्थ तुम्ही अयशस्वी झाला असे नाही. अनेकदा ‘बिझनेस मॉडेल’ चुकीचे ठरतात. त्यामुळे तरुणांनी अपयशाला न घाबरता उद्योजकतेचा ध्यास घ्यावा.
- नरेंद्र बराटे,  संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीड इन्फोटेक

‘टीमवर्क’ महत्त्वाचे 
लोकांकडून चांगले काम करून घेण्यासाठी तुमच्या सोबत असणाऱ्या टीमवर विश्‍वास ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करून त्यांना गरज असेल त्या वेळी मदत, मार्गदर्शन केले तर त्यांनाही तुमच्याबद्दल आदर वाढेल. यातून ‘टीमबिल्डिंग’ तर होईलच, शिवाय तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे आणि तत्परतेने होईल. सध्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान वापरावर भर दिला जात आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र तंत्रज्ञानाचा अधिक वापर न करताही तितकेच जलद आणि नियोजनबद्ध काम करता येते याचे ‘मुंबईचे डबेवाले’ हे अत्यंत समर्पक उदाहरण आहे. 
- विशाल तांबे,  नगरसेवक.

कौशल्यावर लक्ष केंद्रित करा आयुष्यात आलेल्या संकटांना ताकदीने 
सामोरे जायला शिका. स्वतःची प्रतिमा स्वच्छ कशी ठेवता येईल आणि समाजात वावरताना लोकांशी उत्तम संवाद कसा साधता येईल, यावर भर द्यावा. स्वतःमधील कौशल्याला वाट देण्यासह आनंदी आणि स्वच्छंदी जीवन जगावे. संघर्षाला सामोरे जाण्याचा स्वतःमध्ये आत्मविश्‍वास असला पाहिजे. स्वतःवर विश्‍वास ठेवला तर नक्कीच यशस्वी व्हाल. स्वतःच्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करा. संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्या. सामाजिक कौशल्य वृद्धिंगत करण्यावरही आपण भर दिला पाहिजे. वादविवादावर भर न देता स्वच्छंदी जगाल तर आनंदी राहाल; तसेच करिअर स्कील्समध्ये यशस्वी व्हाल.
- नीलय मेहता, संस्थापक, नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

कौशल्याधिष्ठित शिक्षण हवे
ज्ञान आणि कौशल्य असेल, तर आपण प्रगतीचे शिखर गाठू शकतो. त्यासाठी नवीन उपक्रम आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीवर भर दिला पाहिजे. मीही नवनिर्मिती करू शकतो, हा विश्‍वास स्वतःमध्ये निर्माण करण्याची तयारी करावी. यातूनच आपल्यातील उद्योजक घडू शकतात. परीक्षाकेंद्रित शिक्षणपद्धतीऐवजी समस्या सोडविणाऱ्या शिक्षणपद्धतीचा आपण अवलंब केला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल करणे गरजेचे वाटते. आपण उद्योजक बनू शकतो, हा आत्मविश्‍वास त्यांच्यात वृद्धिंगत करण्यावर भर द्यावा. त्यांच्यातील कौशल्य विकसित केली पाहिजेत. टॅलेंट, इनोव्हेशनचा विचार करणारी तरुण पिढी देशाला समृद्धीकडे नेऊ शकते.
 - दीपक शिकारपूर,‘सीड इन्फोटेक लिमिटेड’चे संचालक 

अपयशाला घाबरू नका 
कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मेहनत करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यशासाठी वेगळा ‘शॉर्टकट’ नसतो. हे तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे. काही वेळा आपल्याला हवे ते मिळविण्यात अपयश येते; मात्र त्याने खचून न जाता तरुणांनी नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत. परिषदेमध्ये आतापर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीदेखील यशाचे शिखर गाठण्याआधी अनेकदा अपयशाचा, समस्यांचा सामना केल्याचे सांगितले; परंतु इच्छाशक्ती, मेहनत आणि सातत्य यांच्या साह्याने वाटचाल केल्यास नक्कीच यश मिळते.      
- डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com