पुणे : रस्ता ओलांडण्याचे सुरक्षित मार्ग पुढे आणावेत

पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांत असलेल्या पादचारी उड्डाणपुलाच्या दुरवस्थेबद्दल ‘सकाळ’मधून गुरुवारी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
Flyover
FlyoverSakal
Summary

पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांत असलेल्या पादचारी उड्डाणपुलाच्या दुरवस्थेबद्दल ‘सकाळ’मधून गुरुवारी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

पुणे - पादचारी उड्डाणपुलाचा (Flyover) प्रभावी आणि परिणामकारकपणे वापर होण्यासाठी तेथे सरकते जिने (Sliding Ladder) उभारावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता (Cleaning) व सुरक्षितता (Security) या पादचारी उड्डाणपुलावर असलीच पाहिजे, असा सूर पुणेकरांनी गुरुवारी काढला. त्यासाठी कालसापेक्ष बदल करण्याचा सल्लाही पुणेकरांनी दिला आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागांत असलेल्या पादचारी उड्डाणपुलाच्या दुरवस्थेबद्दल ‘सकाळ’मधून गुरुवारी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातून या प्रातिनिधीक प्रतिक्रिया पुढे आल्या आहेत. शहरात रस्ता ओलांडणे खरोखरच कठीण झाले आहे. रस्ता ओलांडताना रोजच्या रोज अपघात होत आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेतील सर्वांत दुर्लक्षित असलेला घटक म्हणून पादचाऱ्यांकडे पाहिले जाते. ही अवस्था बदलण्यासाठी रस्ता ओलांडण्याचे सुरक्षित मार्ग पुढे आणावे आणि असलेल्या मार्गांचा पूर्णक्षमतेने वापर करावा, असे आवाहन वाचकांनी यातून केले.

पुणेकरांचा पादचारी उड्डाणपुलाला थंड प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले व रस्ता ओलांडणेच पसंत केले. या पुढे पुणे महापालिकेने उड्डाणपुलावर खर्च करू नये. त्याचा वापर दारू अड्डे व बेवारस लोकांसाठी होतो, तसेच उड्डाणपुलावरून जाण्यास जास्त वेळ लागतो.

- हरीश कावतकर, नारायण पेठ

पादचारी लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी उड्डाणपूल हा पर्याय नाही, हे मुंबईत किमानपक्षी २५ वर्षांपूर्वी ओळखले होते. म्हणून, तर अगदी चर्चगेटला गर्दीच्या वेळीसुद्धा पादचारी मार्गावर पोलिस चक्क दोरी धरुन उभे राहतात आणि पादचारी रस्ता ओलांडतात. हाच सर्वात उपयुक्त पर्याय ठरला आहे. दोन पोलिस पुरेसे होतात. प्रयत्न करून पाहिला तर उपयोग कळेल.

- श्रीकांत सेवक, पुणे

शहरातील बहुतेक सर्व पादचारी उड्डाणपूल व डहाणूकर कॉलनी येथील भुयारी मार्ग हे चौकात बांधले आहेत. तेथे ट्रॅफिक सिग्नल असल्याने पादचाऱ्यांना पुलावर चढून जाण्याऐवजी सरळ रस्ता ओलांडणे सोयीचे व कमी श्रमाचे वाटते. पादचारीपूल तसेच भुयारी मार्ग दोन चौकांमध्ये बांधल्यास त्याचा जास्त वापर झाला असता.

- सुरेश वाघ, कोथरूड

प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या जनतेला फसविण्याचा हा प्रकार आहे. चुकीचे सर्व्हेक्षण करून किंवा सर्व्हेक्षण न करताच आशा प्रकारच्या कामांना मंजुरी देणार जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करून अशा प्रोजेक्टसाठी वाया गेलेला पैसा वसूल करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. अशा प्रकारच्या पादचारी उड्डाणपुलाचा वापर फक्त फ्लेक्सबाजीसाठी तरी कृपया होऊ देऊ नये.

- विजय शितोळे, बिबवेवाडी

कोकण एक्स्प्रेस चौकातील पादचारी पुलाची परिस्थिती वाईट झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनुपम दर्शनकडून आपण पुलावरून रस्ता ओलांडून जाऊ शकतो, परंतु पुढे चितळेंच्या दुकानात जाताना खाली दुसरा रस्ता ओलांडावा लागतो. म्हणजेच हा पुलाचा उद्देश पूर्ण होत नाही. शिवाय लिफ्ट बंद, ८० पायऱ्या चढणे, उतरणे हे वयस्कर लोकांसाठी शक्य नाही. शिवाय लिफ्टधील व पुलावरील दुर्गंधी असते.

- सुलभा इंगळेश्वर, पुणे

पादचारी पूल हे अतिशय उंचावर बांधणे गरजेचे आहे, कारण वाहने त्याखालून सहजपणे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुलांची उंची ३-४ मजली इमारतीएवढी उंच असते. ज्येष्ठ नागरिक (सामान्यतः पादचाऱ्यांमध्ये हे लोकच जास्त असतात) एवढे जिने चालून जाणे आणि पुन्हा उतरून येणे ही अपेक्षा करणे कितपत योग्य आहे?

- सुनील बक्षी, पुणे

पुण्यातील पादचारी पूल नागरिकांकडून जास्त प्रमाणात वापरले जाण्यासाठी मेट्रोसारखे सरकते जिने बसवले पाहिजेत. नागरिकांना लिफ्ट बंद पडण्याची भीती राहणार नाही. पुलावर जाणे व खाली येणे सोपे होईल.

- हेमंत भालेराव, पुणे

हडपसरचा गोंधळेनगर येथील पादचारी मार्ग तळीराम आणि छोट्या दुकानाने व्यापून गेला आहे. महिला, प्रौढ आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. या लोकांवर कारवाई होत नाही हे दुःखद आहे.

- राहुल प्रभाकर बिराजदार, हडपसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com