पळून गेलो नाही; सर्वांचे पैसे देणार - डीएसके

पळून गेलो नाही; सर्वांचे पैसे देणार - डीएसके

पुणे - '‘कंपनी सक्षम आहे. मी पळून गेलेलो नाही. कोणाचेही पैसे बुडणार नाहीत. सर्वांचे पैसे मी देणार आहे,’’ असा दावा बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला. ठेवीदारांना पैसे कसे परत करणार याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार केला असून, तो न्यायालयात सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठेवीदारांचे पैसे बुडविल्याच्या कारणावरून डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. काही हजार ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. तसेच कंपनीच्या आर्थिक परिस्थितीची माहितीही दिली. ठेवीदारांचे पैसे कसे देणार? हे सांगण्यासाठी पुढील तारखेला न्यायालयात त्याचा प्लॅन सादर करणार आहे. त्यानुसार पैसे दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.

कुलकर्णी म्हणाले, ‘‘कंपनीने १३ प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जवळपास दोन हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी बॅंकांचे ६०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते दिल्यानंतरही १४०० कोटी रुपये शिल्लक राहतात. त्यापैकी आठ हजार ठेवीदारांचे ५८९ कोटी रुपये देणे आहे.

सर्व ठेवीदारांचे पैसे एकाच टप्यात द्यावयाचे नाहीत. ज्या ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपली आहे, अशी रक्कम १६५ कोटी रुपये आहे. उर्वरित ठेवीदारांची मुदत पुढीलवर्षी संपत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. फुरसुंगी येथील ड्रिमसिटी प्रकल्पासाठी परदेशी गुंतवणूकदार मिळाले आहेत. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर जवळपास १० हजार कोटी रुपये येणार आहप्त. याशिवाय, डीएसके टोयाटोसह अन्य उद्योगांची मालमत्ताही मोठी आहे. त्यामुळे कंपनी सक्षम असून कोणाचेही पैसे बुडणार नाहीत.’’

फुरसुंगी येथील सेझ प्रकरणात इस्राईल कंपनीशी मोडलेला करार, त्यानंतर झालेला अपघात, त्यामुळे ठेवीदारांनी पैसे काढून घेण्यास केलेली सुरवात आणि त्यातच नोटाबंदी व जीएसटीमुळे कंपनीपुढे रोख रकमेची कमतरता निर्माण झाली. त्यातून ही सर्व अडचण निर्माण झाली; परंतु आम्ही त्यातून हळूहळू बाहेर पडत आहोत, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com