सेवानिवृत्त वन कर्मचाऱ्याने सोडले वन्यजीवांसाठी पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

वरवंड: सध्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर देऊळगाववाडा (ता. दौंड) वनक्षेत्रातील वन्यजीवांसाठी पाणवठ्यात पाणी सोडण्यासाठी अनेकांचे हात पुढे सरसावत
आहेत. मात्र, वन विभागाच्याच सेवेतून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी मच्छिंद्र मंडले यांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत सेवानिवृत्तीदिनी वन्यजीवांसाठी पाणवठ्यात तब्बल सात हजार लिटर पाणी सोडून वन व वन्यजीवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

सध्या उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच देऊळगावगाडा वनक्षेत्रातील दोन्ही पाणवठे कोरडे पडल्याची "सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर अनेक दानशूरांनी वन्यजीवांसाठी मदतीची इच्छा व्यक्त केली. काही जणांनी टॅंकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडले. त्यामुळे पाणवठ्यात ऐन उन्हाळ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध झाला होता. सध्या एप्रिल महिन्याच्या उन्हाच्या तीव्रतेने पाणवठ्यातील पाणी कमी झाले. याचा विचार करून वन विभागातील वन कर्मचारी मंडले यांनी स्वतःच्या सेवा निवृत्तीच्या दिवशी वन्यजीवांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते दाखवून दिले. निवृत्तीचे औचित्य साधून त्यांनी वन्यजीवांसाठी मदतीचा हात पुढे केला. सध्या पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी कुटुंबासमवेत वन्यजीवांसाठी पाणवठ्यात टॅंकरद्वारे सात हजार लिटर पाणी सोडले. या वेळी वनपरिमंडल अधिकारी अशोक पवार, मच्छिंद्र मंडले, पत्नी नंदा मंडले, वन कर्मचारी भरत शितोळे, बाबासाहेब कोकरे आदी उपस्थित होते. पाणवठ्यात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती बंद होणार असल्याचे वन अधिकारी पवार यांनी सांगितले. दरम्यान, आपण ज्या विभागात सेवा केली त्याचे ऋण फेडण्यासाठी काही ना काही केले पाहिजे. याची प्रचिती मंडले त्यांच्या आदर्शवत उपक्रमातून दिसून आली असल्याचे पवार यांनी सांगितले. वनक्षेत्रातच मंडले यांचा वन अधिकारी यांनी सत्कार केला.

Web Title: Retired forest worker leaves water for wildlife in daund taluka