शिक्षण अन्‌ आरोग्याचा वसा घेतलेल्या रितू छाब्रिया 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

रितू छाब्रिया... सामाजिक क्षेत्रातील सुपरिचित नाव. भारतातील नामांकित फिनोलेक्‍स कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्य. कंपनीच्या ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) प्रमुख. औद्योगिक घराण्याची मोठी पार्श्‍वभूमी असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक सामाजिक क्षेत्राची निवड केली. केवळ निवडच नाही; तर १८ वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ मध्ये त्यांनी ‘मुकुल माधव फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. लहान मुले हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने शिक्षण आणि आरोग्य या विषयावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

रितू छाब्रिया... सामाजिक क्षेत्रातील सुपरिचित नाव. भारतातील नामांकित फिनोलेक्‍स कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्य. कंपनीच्या ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) प्रमुख. औद्योगिक घराण्याची मोठी पार्श्‍वभूमी असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक सामाजिक क्षेत्राची निवड केली. केवळ निवडच नाही; तर १८ वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ मध्ये त्यांनी ‘मुकुल माधव फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. लहान मुले हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने शिक्षण आणि आरोग्य या विषयावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. केवळ निधी उपलब्ध करून देणे अथवा सेवा पुरविणे, यावरच त्या थांबल्या नाहीत; तर गुणवत्ता आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. कोणताही प्रकल्प हाती घेतल्यानंतर तो तडीस नेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आजपर्यंत त्यांचे सर्व प्रकल्प यशस्वी झाले आहेत. नव्हे, तर सरकार तसेच अन्य सामाजिक संस्थांसाठी ते ‘रोल मॉडेल’ ठरले आहेत. हे सर्व करताना त्यांना अनेक अडचणीही आल्या. अनेक खडतर परिस्थितीचा सामनाही करावा लागला. मात्र, त्यावर मात करत त्यांनी अगदी तळागळातील गरजूंपर्यंत सेवा पोचविल्या. आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलांनाही इंग्रजी शिक्षणाचा अधिकार मिळावा, म्हणून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सर्व सोयीसुविधांयुक्त शाळा सुरू केली. शारीरिक, मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांसाठी साताऱ्यामध्ये पुनर्वसन केंद्र उभारले. पुण्यासारख्या विकसित शहरातील ‘पीआयसीयू’ची (बालरुग्ण अतिदक्षता विभाग) गरज ओळखून केईएम रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्चून विभाग सुरू केला.

आज राज्यातील कानाकोपऱ्यातील बालक रुग्ण या विभागाचा लाभ घेतात. नव्हे, तर अनेक बालरुग्णांना निरोगी आरोग्य बहाल करण्यात या विभागाने मोठा वाटा उचलला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत देऊन अनेक गरजू, गरीब रुग्णांचे फाउंडेशनने आयुष्य सावरले आहे. फाउंडेशनमधील सर्व प्रकल्पांमध्ये रितू जातीने लक्ष घालतात. किंबहुना, या कामासाठी त्या दिवसातील बारा तास देतात. सामाजिक कार्य, हेच माझे आयुष्य आहे, असे त्या आवर्जून नमूद करतात. ग्रामीण भागातील शाळा असो, रुग्णालये असो वा संस्था, त्यांना विकासाच्या वाटा उपलब्ध करून देण्याचे मोलाचे काम रितू यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून केले आहे. फाउंडेशनच्या लाभार्थ्यांचा आकडा लाखांपर्यंत पोचला असेल, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. फाउंडेशनची पायरी चढणारा गरजू कधीही रिकाम्या हाताने परतलेला नाही, असे त्या ठामपणे सांगतात.