शहरात रस्ते दुरुस्तीचा ‘डोंगर’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

खोदाई केलेल्या रस्त्यांची पाहणी करून आवश्‍यक ती कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी यंत्रणा काम करत असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचना करण्यात आल्या आहेत. सात जूनपर्यंत हे कामे होणे अपेक्षित आहे. 
- राजेंद्र राऊत, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

पुणे - खासगी कंपन्यांनी खोदाई केलेले सुमारे शंभर किलोमीटर लांबीचे रस्ते महापालिकेला जेमतेम वीस दिवसांमध्ये पूर्ववत करावे लागणार आहेत. त्यामुळे रोज पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी लागेल. येत्या सात जूनपर्यंत ही कामे करण्यात येणार आहेत; मात्र पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाल्याने रस्त्यांची कामे होणार का, असा प्रश्‍न आहे.

शहरात विविध सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांच्या मागणीनुसार सुमारे सव्वादोनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई करण्यास महापालिकेकडून परवानगी देण्यात आली होती. त्यात महावितरण, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी (एमएनजीएल) आणि रिलायन्स या कंपन्यांचा समावेश आहे. या खोदाईतून महापालिकेला सुमारे ५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. कंपन्यांनी रस्ते खोदाई केल्यानंतर ते पूर्ववत करण्याचे काम महापालिका करते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी एक महिना खोदाईची कामे बंद केली जातात. त्यानुसार या कंपन्यांना सूचनाही केल्या आहे. पावसाळा सुरू होण्याआधी म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे रस्ते पूर्ववत करणे अपेक्षित असते. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याचे महापालिकेच्या पथ विभागाने सांगितले. 

खोदाई झालेल्या सव्वादोनशेपैकी साधारणत: शंभर किलोमीटरचे रस्ते खोदाईमुक्त तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले आहेत. त्यामुळे उर्वरित शंभर किलोमीटरच्या रस्त्यांची येत्या वीस दिवसांत दुरुस्ती करावी लागणार आहे. त्या दृष्टीने कामे सुरू असली, तरी एवढ्या कमी वेळेत ते शक्‍य होईल का, असा प्रश्‍न सध्याचे मॉन्सूनपूर्व पावसाचे वातावरण पाहता उपस्थित केला जात आहे.

पदपथांची खोदाई सुरूच
शहरात एक मेनंतर रस्ते खोदाईला बंदी घालण्यात आली असली, तरी अनेक भागांत पदपथांची खोदाई करण्यात येत आहे. त्या ठिकाणी अजूनही देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामांचे स्वरूप लक्षात घेता, ती महिनाभरात पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे पदपथांची खोदाई आणि त्याचे कामे कधी संपणार, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Road repair in the city