रस्त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’

रस्त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’

पुणे - वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्याकरिता महापालिका प्रशासनाने दोनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यात रस्त्यांचा दर्जा, वाहनांची वर्दळ आणि पादचारी या घटकांचा विचार करून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

शहरातील खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्षागणिक सरासरी दोन लाख नवी वाहने रस्त्यावर येत असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीवरून दिसून येत आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक समस्या गंभीर बनली असून, वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक असुरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध रस्ते आणि त्यावरील ताण लक्षात घेऊन रस्त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याचे नियोजन महापालिकेच्या अर्थसंकल्पात (२०१७- १८) केले आहे.

दरम्यान, उपनगरांमधील काही रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात लोहगाव येथील पुणे विमानतळ परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. तसेच, बाजार पेठांमधील रस्ते आणि काही चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी निरनिराळ्या सुविधा असतील.

‘रोड मेंटेनन्स व्हॅन’ उपलब्ध
‘इंडियन रोड काँग्रेस’च्या धोरणानुसार रस्त्यांची पाहणी करण्यात येणार असून, त्यानुसार पुरेशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. ही कामे सुरू असतानाच, रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजीही करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘रोड मेंटेनन्स व्हॅन’ उपलब्ध केल्या आहेत. सध्या चार गाड्या असून, आणखी चार गाड्या उपलब्ध करण्यात येणार आहेत. नागरिक आणि वाहनचालकांच्या तक्रारीनंतर रस्ते दुरुस्तीची कामे लगेचच हाती घेण्यात येतील, असे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com