भाजलेल्या रुग्णांवर होणार प्रभावी उपचार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पुणे - भाजलेल्या रुग्णांवर तातडीने प्रभावी उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मंगळवारपासून प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. "ग्लोबल हेल्थ आलायन्स' आणि "युनिव्हर्सिटी ऑफ इंग्लंड' येथील तज्ज्ञ यात मार्गदर्शन करणार आहेत. या अंतर्गत "बेसिक लाइफ सपोर्ट'चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

पुणे - भाजलेल्या रुग्णांवर तातडीने प्रभावी उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मंगळवारपासून प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. "ग्लोबल हेल्थ आलायन्स' आणि "युनिव्हर्सिटी ऑफ इंग्लंड' येथील तज्ज्ञ यात मार्गदर्शन करणार आहेत. या अंतर्गत "बेसिक लाइफ सपोर्ट'चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

शहरात किंवा ग्रामीण भागात भाजण्याची घटना घडल्यानंतर रुग्णाला तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले जाते. त्यामुळे रुग्णांसाठी सरकारी रुग्णालय हाच मोठा आधार असतो. अशा रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर औंध येथे सुरू आहे. या वेळी कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होत्या. 

आरोग्य खात्याच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिक यांच्यात उपचारांचे कौशल्य वाढविण्यासाठी आणि खात्याचा प्रशिक्षणात नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सुरू केला आहे. भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणारे राज्यातील डॉक्‍टर यात सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण शिबिरात इंग्लंड येथील बर्न स्पेशालिस्ट क्रिस्टिना स्टाइल्स, ऍनड्रयू किर्क आणि शार्यन एडवर्ड हे दोन दिवस सरकारी डॉक्‍टरांना भाजलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन आणि "बेसिक लाइफ सपोर्ट' याचे प्रशिक्षण देणार आहेत, असेही आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी सांगितले. 

भाजलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार होण्यासाठी डॉक्‍टरांकडे विशेष कौशल्य आवश्‍यक असते. या रुग्णांमध्ये जंतुसंसर्ग वेगाने होत असल्याने उपचारांसाठी आलेल्या 40 ते 50 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. अर्थात रुग्ण किती टक्के भाजला आहे, हे महत्त्वाचे असते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सरकारी डॉक्‍टरांचे कौशल्य आणि क्षमता वाढविण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. ही या प्रशिक्षण शिबिरातील पहिली तुकडी आहे. 
- डॉ. एच. एच. चव्हाण, उपसंचालक, आरोग्य विभाग, पुणे परिमंडळ