नववीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे - नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून यंदा पुनर्परीक्षा होणार आहे. शाळांनी जून अखेरपर्यंत ही फेरपरीक्षा घ्यावी, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. त्यामुळे या परीक्षेद्वारे नववी नापास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन दहावीच्या वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे. 

पुणे - नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून यंदा पुनर्परीक्षा होणार आहे. शाळांनी जून अखेरपर्यंत ही फेरपरीक्षा घ्यावी, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. त्यामुळे या परीक्षेद्वारे नववी नापास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन दहावीच्या वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे. 

दहावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून राज्य शिक्षण मंडळातर्फे 2015 पासून फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. त्याप्रमाणे नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने सप्टेंबर 2017 मध्ये जाहीर केला. त्यानुसार यंदा पहिल्यांदाच नववीच्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा होणार आहे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर पुन्हा अभ्यास करावा लागणार असून, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झाल्यास दहावीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. सर्व माध्यमिक शाळांमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात नववीतील गरजू विद्यार्थ्यांसाठी जलदगतीने शिक्षणाच्या पद्धती अमलात आणल्यावरदेखील काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना फेर परीक्षेद्वारे संधी उपलब्ध करून दिली आहे. 

शिक्षण विभागाचा आदेश : 
- नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत फेर परीक्षा घ्याव्यात. 
- केवळ अनुत्तीर्ण झालेल्या विषयांसाठीच ही परीक्षा घ्यावी. 
- फेरपरीक्षेसाठी मूल्यमापन पद्धती ही नववीसाठी असलेल्या सरासरी पद्धतीप्रमाणेच राहील. 
- मानसिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना नववीतील मूलभूत संबोधांवर आधारित प्रश्‍नपत्रिका आवश्‍यकता भासल्यास तयार करावी. 
- गंभीर आजाराने पीडित विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या दिव्यांगांसाठी तयार केलेल्या मूलभूत संबोध प्रश्‍नावलीची सवलत द्यावी. 

""नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाल्यावर जून अखेरपर्यंत फेरपरीक्षा घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना नववीचा निकाल कळवितानाच फेर परीक्षेच्या तारखा कळवायच्या आहेत. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.'' 
- गंगाधर म्हमाणे, संचालक, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. 

Web Title: ROUND EXAM FOR NINE CLASS STUDENT