पुणे - शहराध्यक्ष पदावरून रिपब्लिकन पक्षामध्ये (आठवले गट) गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. दोन्ही गटांना एक-एक वर्ष अध्यक्षपद देण्याबरोबरच शिवसेनेच्या धर्तीवर संपर्कप्रमुख हे पद नव्याने निर्माण करून त्यावर अशोक शिरोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अशोक कांबळे यांच्याकडे अध्यक्षपद कायम राहिले आहे.
निवडणूक प्रक्रिया राबवून शहराध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यासाठी जुलै महिन्यात झालेल्या मतदानामध्ये शहराध्यक्षपदी अशोक कांबळे हे विजयी झाले. मात्र, निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आक्षेप घेत दुसऱ्या गटाने अशोक शिरोळे यांना शहराध्यक्ष म्हणून घोषित केले होते. त्यामुळे हा वाद पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यापर्यंत गेला होता. त्यावर एकत्र बसून निर्णय घ्यावा, असे आदेश आठवले यांनी दिले होते.
त्यानुसार दोन्ही गटांच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये दोन्ही गटांना मान्य असा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार शहराध्यक्ष पद एक वर्ष एका गटाकडे, तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या गटाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, संपर्कप्रमुख हे पद नव्याने निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे अशोक कांबळे यांच्याकडे शहराध्यक्षपद कायम ठेवून संपर्कप्रमुख म्हणून अशोक शिरोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर युवक अध्यक्षपदी शैलेश चव्हाण, कार्याध्यक्षपदी संजय सोनावणे आणि बसवराज गायकवाड, सरचिटणीसपदी महिपाल वाघमारे, बाबूराव घाडगे, वरिष्ठ उपाध्यक्षपदावर भगवान गायकवाड, वसंतराव बनसोडे, कालिदास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पक्षाने पत्रकाद्वारे कळविले आहे.
|