काँग्रेस 'मुक्त' देशाची भाषा नकोः सरसंघचालक

सलील उरुणकर 
रविवार, 1 एप्रिल 2018

भागवत म्हणाले, "राष्ट्रबांधणाचे काम हे कोणा एका थोर पुरूषाच्या कर्तृत्वाचे फळ असे नसते. जे राष्ट्र तयार होते ते काम करणाऱ्यांची, न करणाऱ्यांची, काम करणाऱ्यांना खाली खेचणाऱ्यांच्या अशा सगळ्यांच्या कामाची गोळा बेरीज असते. संघटन करताना सर्वांना सोबत घेऊन जावे लागते. त्यासाठी सर्वांचे विचार जुळायची काही आवश्‍यकता नसते.'' 

पुणे : "राष्ट्राच्या उभारणीसाठी चाललेल्या प्रयत्नांची दिशा ही सर्वसमावेशक असली पाहिजे. आम्हाला सगळा समाज संघटित करायचा आहे. राष्ट्रबांधणीच्या कार्यात आमचे विरोधकही आमचे सहप्रवासी आहेत. त्यामुळे "मुक्त'ची भाषा राजकारणात चालते. आम्ही संघामध्ये ती मूळीच करत नाही,'' असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या "कॉंग्रेस मुक्त भारत' नाऱ्याचा आणि कॉंग्रेस-आघाडीने दिलेल्या "संघ मुक्त भारत' घोषणेविषयी बोलताना भागवत यांनी हे वक्तव्य केले. 

भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव आणि लेखक डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी लिहिलेल्या तसेच अनुवाद केलेल्या एकूण सहा पुस्तकांचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुळे यांच्यासह "स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप'चे अध्यक्ष संदीप वासलेकर उपस्थित होते. वासलेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना राष्ट्रबांधणीच्या कार्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेविषयी भाष्य केले.

"संघ असेल किंवा काँग्रेस या दोन्ही संघटना शंभर, दिडशे वर्षे जुन्या आहेत. अनेकांनी त्यासाठी कष्ट घेतले आहेत. संघाचे टिकाकार म्हणतात "संघ मुक्त भारत' पाहिजे तर कॉंग्रेस विरोधक म्हणतात "कॉंग्रेस मुक्त भारत' पाहिजे. काही लोकांना "मुक्त'विषयी बोलणे सोपे आहे, पण आपल्याला कशाने 'युक्त' भारत पाहिजे याचा विचार केला पाहिजे,'' असे मत वासलेकर यांनी व्यक्त केले. या मुद्‌द्‌याचा उल्लेख करत भागवत यांनी त्यांच्या भाषणात केला. 

भागवत म्हणाले, "राष्ट्रबांधणाचे काम हे कोणा एका थोर पुरूषाच्या कर्तृत्वाचे फळ असे नसते. जे राष्ट्र तयार होते ते काम करणाऱ्यांची, न करणाऱ्यांची, काम करणाऱ्यांना खाली खेचणाऱ्यांच्या अशा सगळ्यांच्या कामाची गोळा बेरीज असते. संघटन करताना सर्वांना सोबत घेऊन जावे लागते. त्यासाठी सर्वांचे विचार जुळायची काही आवश्‍यकता नसते.'' 

"सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी एक वर्षापूर्वी प्रत्यक्ष परिचय झाला. भागवत यांची विशिष्ट प्रतिमा आहे. त्यांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. त्यांच्या विशिष्ट प्रतिमेपलिकडेचे मोहनजी काय आहेत हे जाणून घेण्याची इच्छा होती. म्हणून त्यांना हिंदु-मुस्लिम ऐक्‍य, विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी अशा विविध विषयांवर प्रश्‍न विचारले. त्यांची उत्तरे ऐकून असे लक्षात आले की एका अर्थाने खरे मोहन भागवत हे जनतेला कळलेच नाहीत. म्हणून माझ्या कार्यक्रमाला येण्याचे त्यांना आमंत्रण दिले जेणेकरून माझ्या चाहत्या युवा वर्गाला त्यांचे विचार ऐकायला मिळतील,'' असे मत डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी व्यक्त केले. 

Web Title: RSS chief Mohan Bhagwat statement on Congress mukt India