नाट्यसंमेलनाध्यक्ष एकमताने ठरवा- सतीश आळेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

पुणे - 'अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सन्मानाचे आहे, ते सन्मानानेच द्यायला हवे. त्यासाठी निवडणूक कशाला? खरंतर एकमताने नाट्यसंमेलनाध्यक्ष ठरवायला हवा,'' असे मत नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.

मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ ठरल्यानंतर लगेचच अध्यक्षपदाची निवडणूक सुरू झाली; पण नाट्य संमेलनाचे स्थळच अद्याप ठरले नसल्याने नाट्य संमेलनाध्यक्षपदाची "निवडणूक' सुरू झालेली नाही. मात्र पडद्यामागे काही नावांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आळेकर यांच्याशी संवाद साधला असता "निवडणूक पद्धतीला माझा विरोध आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केले.

आळेकर म्हणाले, 'निवडणुकीमुळे डॉ. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे अशा मान्यवरांना नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होता आले नाही. त्यामुळे इथून पुढे नाट्य संमेलनाध्यक्षपदासाठी कोणाचीही निवड करा, पण बिनविरोध करा. एकमताने करा.''

यासंदर्भात नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, 'नाट्य संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक नसावी. हे पद सन्मानाने दिले जावे, असे मलाही वाटते; पण परिषदेच्या घटनेनुसार निवडणूक घ्यावी लागते. ती आता पूर्वीसारखी नाही. शाखांमार्फत परिषदेसमोर जी नावे येतात, ती आम्ही गोपनीय ठेवतो आणि आलेल्या नावांपैकी एकाची निवड करतो. एकमेकांत स्पर्धा, टीका होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे.''

उस्मानाबाद किंवा नागपूर
'अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जळगाव येथे व्हावे, असे प्रयत्न सुरू होते; पण हे स्थळ रद्द झाले आहे. कोल्हापूरच्या स्थळाचीही चर्चा होती. तेथेही संमेलन होऊ शकणार नाही. त्यामुळे उस्मानाबाद किंवा नागपूर असे दोन पर्याय आमच्यासमोर आहेत. यापैकी एक स्थळ परिषदेच्या पुढील बैठकीनंतर सर्वानुमते जाहीर करण्यात येईल'', अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली. दरम्यान, संमेलनासाठी उस्मानाबाद शाखेचे निमंत्रण स्वीकारले जाण्याचीच शक्‍यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.