मावळातील ब्रिटिशकालीन पूल अधांतरीच

गणेश बोरुडे
सोमवार, 19 जून 2017

गतवर्षी महाडजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे खडबडून जागे होत,१६५ दिवसांत पर्यायी पूल बांधणाऱ्या प्रशासनाने कोकण आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या मावळातील पुरातन ब्रिटिशकालीन पुलांबाबत मात्र काहीच ठोस उपाययोजना न केल्यामुळे,मावळातील सुदुंबरे,इंदोरी,टाकवे, लोणावळा अमृतांजन आणि तळेगाव स्टेशन येथील बिनभरवशाचे ब्रिटिशकालीन पूल अद्यापही अधांतरीच आहेत.

तळेगाव स्टेशन : गतवर्षी महाडजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे खडबडून जागे होत,१६५ दिवसांत पर्यायी पूल बांधणाऱ्या प्रशासनाने कोकण आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या मावळातील पुरातन ब्रिटिशकालीन पुलांबाबत मात्र काहीच ठोस उपाययोजना न केल्यामुळे,मावळातील सुदुंबरे,इंदोरी,टाकवे, लोणावळा अमृतांजन आणि तळेगाव स्टेशन येथील बिनभरवशाचे ब्रिटिशकालीन पूल अद्यापही अधांतरीच आहेत.

तळेगाव-चाकण मार्गावरील इंदोरीच्या इंद्रायणी नदीवर  ब्रिटिशांनी बांधलेल्या कोकण आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या दीडशे वर्ष जुन्या चिरेबंदी पुलावरील वाहतुकीचा ताण,शेजारी बायपासवर धलेल्या पर्यायी पुलामुळे कमी झाला असला तरी अडथळे न बसविल्यामुळे अधूनमधून अवजड वाहने पुलावरुन जातात.त्यामुळे इंदोरीच्या पुलासही धोका कायम आहे.तळेगाव-चाकण मार्गावरील सुदुंबरेच्या सुधा नदीवरच्या ब्रिटिशकालीन अरुंद दगडी पूलावरुन रोज हजारो अवजड वाहनांची एकेरी वाहतूक चालूच आहे.ऐन वळणावरील सुधा पुलाला दुसरा समांतर पूल झाला असला तरी,एकेरी वाहतुकीसाठी या पुलाचा वापर चालूच असल्याने धोका कायम  आहे.कठड्याच्या चिरा निखळल्याने,पूल कधी कोसळेल याचा नेम नाही.कान्हे ते टाकवे मार्गावरील ११ गाळ्यांच्या विस्तीर्ण ब्रिटिशकालीन पुलावरुन लगतच्या उदयोगांकडे अवजड वाहनांची ये जा सुरुच असून,पर्यायी मार्ग नसल्यामुळे नाईलाजाने सार्वजनिक बांधकाम विभाग अद्यापही या पुलावरची अवजड वाहतूक रोखू शकलेला नाही.तळेगाव चाकण राज्य मार्ग क्रमांक ५५ वरील तळेगाव स्टेशनाचा रेल्वे मार्गावरील मुदत संपलेला जवळपास दीडशे वर्षे जुना ब्रिटीशकालीन पूल रेल्वे जीर्ण झाला असून,मुदत संपल्याने रेल्वे प्रशासनाने डिसेंबर २००८ मध्ये हा पूल लोखंडी अडथळे आणि इशारा फलक लावून वाहतुकीसाठी कायमचा बंद केला.मात्र त्यानंतर पुलाच्या देखभालीकडे आणि त्यावरील अतिक्रमणांकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खिळखिळा झालेला हा रेल्वेमार्गावरील धोकादायक पूल कधी खाली रेल्वेमार्गावर कोसळेल याची शाश्वती नाही.

लोणावळ्यातील ब्रिटिशकालीन अमृतांजन पुल,खालचा रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्याचा निर्णय नुकताच रस्ते विकास महामंडळाने घेतला असला तरी,तोपर्यंत तरी द्रुतगती मार्गावरची धोक्याची टांगती तलवार कायम आहे.गतवर्षी महाडच्या सावित्री पुलावरील दुर्घटनेनंतर मावळ तालुक्यातील ब्रिटिशकालीन पुलांसह इतर धोकादायक पुलांची देखील पाहणी करुन तत्कालीन तहसीलदारांनी पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते.संबंधित सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे असताना तसेच सुरक्षेविषयी कायमस्वरुपी उपाययोजना कारण्याऐवजी थातुरमातुर तकलादू उपायोजना म्हणून बसविलेले अडथळे वाहतूकदारांनी अनेकदा तोडल्याने काहीएक फरक पडलेला दिसत नाही.पावसाळयाच्या पार्शवभूमीवर यंदाही सा.बां. विभागाने कसलीही खबरदारी न घेतल्याने मावळातील बिनभरवशाच्या या पुलांवरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांचे जीवन अद्यापही अधांतरीच आहे.