#GyanGanesh सौरऊर्जेमुळे उद्यमशीलतेला ऊर्जा 

#GyanGanesh सौरऊर्जेमुळे उद्यमशीलतेला ऊर्जा 

पुणे - सांगली जिल्ह्यातील कासेगावाहून पुण्यात आलेला युवक नोकरी करताना लहान-मोठ्या वस्तू विकू लागतो. पुढे सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उतरतो. कंपनी स्थापन करतो अन्‌ प्रत्येक जिल्ह्यात सौरऊर्जेचा प्रकाश पोचवितो. त्याची कंपनी आता या क्षेत्रात अग्रणी झाली आहे. "टेबल स्पेस'वर वस्तू विकणारा हा युवक आता 25-30 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करत असून, ग्रामीण भागाशी असलेली नाळ त्याने कायम ठेवली आहे. 

कष्टाला यशाची जोड दिली तर सौरऊर्जेच्या क्षेत्रातही यशस्वी होऊ शकतो, हे संजय दिनकर देशमुख यांनी "पर्ल एनर्जी', "माधुरी सोलर' या कंपन्यांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. एकीकडे बहुराष्ट्रीय कंपन्या आणि चिनी बनावटीच्या उत्पादनांच्या आव्हानांचा सामना करीत देशमुख यांची वाटचाल सुरू आहे. सौरऊर्जेवरील दुचाकी, रिक्षा यांची उत्पादने करण्यासाठी त्यांना जर्मनी, दक्षिण कोरियातील कंपन्यांनीही सहकार्याचा हात पुढे केला आहे. 

वाळवा तालुक्‍यातील कासेगावातून दहावी झाल्यावर देशमुख यांनी इलेक्‍ट्रिक टेलिकम्युनिकेशनची पदविका पूर्ण केली. नोकरीसाठी 1997-98 मध्ये ते पुण्यात आले. नोकरी मिळाली; पण त्यात मन रमेना. स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. काही दिवस दैनंदिन उपयोगाच्या वस्तू त्यांनी प्रदर्शनांमध्ये "टेबल स्पेस'द्वारे विकल्या. त्यानंतर कृषिपंपांसाठी "स्टार्टर' तयार करण्यास सुरवात केली. त्या दरम्यान सौरऊर्जेचा गाजावाजा होऊ लागला. त्यामुळे त्या क्षेत्रात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी सौरऊर्जेवरील कंदील आणि बॅटरी तयार केली. ते उत्पादन लोकप्रिय झाल्याने आत्मविश्‍वास मिळाला. "मेडा'च्या माध्यमातून त्यांना राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सौरऊर्जेवरील पथदिवे बसविण्याची संधी मिळाली. 

दरम्यान, एका जर्मन कंपनीच्या सहकार्याने सौरऊर्जेवरील पंप तयार केले. सौरऊर्जेवरील घरातील दिवे उपलब्ध करून देतानाच म्युझिक सिस्टिमही त्यांनी विकसित केली. पाठोपाठ सौरऊर्जेवरील स्वयंपूर्ण घरांचा प्रकल्प नंदुरबारसह अनेक जिल्ह्यांत राबविला. सौरऊर्जेवरील कृषिपंप, ठिबक सिंचन यंत्रणा, पाणीपुरवठा प्रकल्प राज्यातील बहुतांश जिल्ह्यात राबविले. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातही ही उत्पादने पोचली आहेत. पुण्यात त्यांचा एक कारखाना आणि दोन कार्यालयेही आहेत. महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचेही ते अध्यक्ष होते. 

जिथे वीज वापरली जाते, तिथे सौरऊर्जा वापरण्याची संधी आहे. सौरऊर्जेचे क्षेत्र व्यापक असून, ग्रामीण व शहरी भागातही येथे उत्पादन आणि सेवा क्षेत्राला प्रचंड संधी आहे. मनात उद्यमशीलता आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर सौरऊर्जा क्षेत्र हे चांगले करिअर आहे. 
- संजय देशमुख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com