टेंभे पेटवून कशाचीच तमा न बाळगता बारामतीत श्रमदान

मिलिंद संगई
बुधवार, 23 मे 2018

बारामती शहर - वेळ रात्री सव्वानऊची...स्थळ होते सावंतवाडी गावातील सुरु असलेले सीसीटीचे काम....सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा समारोप काही तासांवर येऊन ठेपलेला....गावचे चित्र बदलायचे आणि टंचाईचा डाग पुसून टाकायचा या निर्धाराने रात्रीचा दिवस करणा-या सावंतवाडी ग्रामस्थांच्या मदतीला एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचे सदस्य आलेले...रात्रीच्या अंधारात टेंभे पेटवून कशाचीच तमा न बाळगता अधिकाधिक काम करण्याच्या जिद्दीने सावंतवाडीचे ग्रामस्थ व फोरमचे सदस्य खोदलेल्या चराची माती व्यवस्थित करुन गुणवत्ता सुधारणेचे काम करत होते.

बारामती शहर - वेळ रात्री सव्वानऊची...स्थळ होते सावंतवाडी गावातील सुरु असलेले सीसीटीचे काम....सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा समारोप काही तासांवर येऊन ठेपलेला....गावचे चित्र बदलायचे आणि टंचाईचा डाग पुसून टाकायचा या निर्धाराने रात्रीचा दिवस करणा-या सावंतवाडी ग्रामस्थांच्या मदतीला एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचे सदस्य आलेले...रात्रीच्या अंधारात टेंभे पेटवून कशाचीच तमा न बाळगता अधिकाधिक काम करण्याच्या जिद्दीने सावंतवाडीचे ग्रामस्थ व फोरमचे सदस्य खोदलेल्या चराची माती व्यवस्थित करुन गुणवत्ता सुधारणेचे काम करत होते. अधिकाधिक गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविण्याच्या ध्येयाने झपाटून हे काम सुरु होते. प्रथमच रात्रीच्या किर्र अंधारात टेंभे पेटवून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वांनी केल्याने या श्रमदानातून सर्वांनाच वेगळा आनंद मिळाला....

सावंतवाडी हे 129 कुटुंब संख्या असलेले 647 लोकसंख्येचे छोटेसे गाव. गावाने या स्पर्धेत 60 शोषखड्डे, तीन रोपवाटिका, सलग समतल चर, बांधबंदिस्ती, लहान मातीचे बंधारे, शेततळे, दगडी बांध, पाझर तलावातील गाळ काढणे, लहान माती बंधारे, सिमेंट बंधारा, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती असे अनेक उपक्रम अत्यंत उत्स्फूर्तपणे केले. 

सकाळ रिलीफ फंड, एन्व्हॉर्यमेंटल फोरमने इंधनासाठी सहकार्य केले. अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती अँग्रो लिमिटेड व भारतीय जैन संघटनेने यंत्रसामग्रीसाठी मदत केली. या शिवाय अनेक हातांनी या गावाला सहकार्य केले. गावचे रुप पालटण्यासाठी केलेले हे प्रयत्न ग्रामस्थांची एकजूट व त्याला समाजाच्या प्रत्येक घटकाने केलेले सहकार्य यामुळे घडले. स्पर्धेत क्रमांक मिळविण्यासह टंचाईपासून मुक्तता हा या मागचा हेतू असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

 

Web Title: satyamev jayate water cup