प्रकुलगुरू, अधिष्ठातापदांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज कार्यभार स्वीकारल्याने प्रकुलगुरू, अधिष्ठाता, अभ्यास मंडळे आणि अधिकार मंडळे यांवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली. विद्यापीठाचे उपकुलसचिव हे पददेखील रिक्त असल्याने तेथे कुणाची नियुक्ती होणार याची चर्चा विद्यापीठात आहे. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज कार्यभार स्वीकारल्याने प्रकुलगुरू, अधिष्ठाता, अभ्यास मंडळे आणि अधिकार मंडळे यांवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली. विद्यापीठाचे उपकुलसचिव हे पददेखील रिक्त असल्याने तेथे कुणाची नियुक्ती होणार याची चर्चा विद्यापीठात आहे. 

नव्या विद्यापीठ कायद्यात प्रकुलगुरूंची नियुक्ती ही सक्तीची आहे, ती कुलगुरूंनी नामनिर्देशनाने करायची आहे. विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजासाठी अधिष्ठाता आवश्‍यक असल्याने त्या पदांवरील नियुक्ती तातडीने कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या पदांवर नियुक्ती मिळविण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी प्रयत्न सुरू केले आहेत; परंतु त्यासाठी जाहिरात, निवड समिती ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

कुलसचिव नरेंद्र कडू यांचा कार्यभार संपल्याने त्या पदाचा कार्यभार इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्याकडे आहे. या पदासाठीदेखील जाहिरात आणि निवड समिती स्थापन करावी लागणार आहे. नव्या कुलगुरूंनी कार्यभार स्वीकारल्याने या प्रक्रियांना आता वेग येईल, अशी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना आशा आहे. 
 

महाविद्यालये "ग्रीन' करा 
पुण्यासारख्या शहरात महाविद्यालये "ग्रीन' करण्यासाठी नव्या कुलगुरूंनी पुढाकार घ्यावा, त्यासाठी काही निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच, अभ्यासक्रमामध्ये लवचिकता आणावी. तो तयार करताना उद्योगांशी समन्वय असावा. याबरोबरच परीक्षा विभागातील कारभार सुरळीत, पारदर्शी आणि विद्यार्थ्यांना आश्‍वासक वाटेल, असा करावा. 
- डॉ. मुक्तजा मठकरी (प्राचार्य, गरवारे महाविद्यालय) 

नॅकचा ए आणि ए प्लस दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना स्वायत्तता मिळवून देण्यासाठी कुलगुरूंनी प्रयत्न करावेत. सर्व महाविद्यालये नेटवर्कद्वारे विद्यापीठाशी जोडावीत आणि व्हर्च्युअल क्‍लासरूमद्वारे प्राध्यापकांनी धडे द्यावेत. पुण्याजवळ शैक्षणिक हब तयार करून एकाच संकुलात सर्व महाविद्यालये उभारण्याचा प्रयत्न करावा. 
- डॉ. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) 

प्राध्यापकांची शैक्षणिक कामगिरी योग्य पद्धतीने मोजण्याची व्यवस्था कुलगुरूंनी निर्माण करावी. यामुळे गुणवत्ता असलेल्या प्राध्यापकांचे योग्य मूल्यमापन होऊन, त्यांना पुढे चांगल्या संधी मिळतील. आता महाविद्यालयांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी कठोर आचार संहिता असावी, त्यासाठी कुलगुरूंनी प्रयत्न करावेत. 
- डॉ. राजेंद्र गुरव (माजी जिल्हाध्यक्ष, पुक्‍टो) 

Web Title: Savitribai Phule Pune University