स्कूल बसचालकाला चक्कर आल्याने अपघात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पिंपरी - मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचालकाला अचानक चक्कर आल्याने चिंचवड येथील संभाजीनगर येथे गुरुवारी (ता. 3) अपघात झाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमधील सर्व मुले सुरक्षित असली तरी घाबरलेली दिसत होती.

संदीप दगडू वडवेकर (वय 48, रा. पिंपळे गुरव) असे बसचालकाचे नाव आहे. पोलिस आणि प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील मुलांना घेऊन निघालेली बस (एमएच 12 ई जी 5744) संभाजीनगर येथील साई उद्यान कॉर्नर गायत्री हॉटेलजवळ आल्यावर चालकाला अचानक चक्कर आली. शुगर कमी झाल्याने चक्कर आल्याचे समजते, त्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटले. चिंचवड येथील जी. जी. इंटरनॅशनल स्कूल (गोयल गंगा)ची ही बस आहे. वेग कमी असल्याने समोर उभी असलेली आय 20 आणि काही दुचाकी यांना बसने ठोकरले. यामध्ये वाहनांचे किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले.

पादचारी गजेंद्र जैन (वय 35, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) हे किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने बसमधील मुलांना काही इजा झाली नाही. घटनेनंतर मात्र सर्व जण घाबरलेले होते. बसचालक आणि पादचारी यांना उपचाराकरिता धनश्री रुग्णालयात दाखल केले आहे. राजू लटांबळे असे बस मालकाचे नाव आहे. या संदर्भात स्कूल व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""स्कूल अद्याप सुरू झालेले नाही. मात्र दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचे जादा तास सुरू आहेत. बसचालक संदीप येथे पूर्वीपासून काम करीत आहेत. चक्कर येत असल्याचे लक्षात येता त्यांनी वाहनाचा वेग कमी केला. यामुळे मोठा अनर्थ टळला.''

Web Title: School Bus Driver accidents