सुरक्षारक्षकामध्ये दडलेला अवलिया चित्रकार ; पेन्सिलद्वारे व्यक्तीचे हुबेहूब चित्र

दीपेश सुराणा
शुक्रवार, 8 जून 2018

सुरक्षारक्षक म्हणून बारा तास काम करावे लागते. एटीएमची सुरक्षा करतानाच चित्र काढण्याची आवड जोपासत आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग होतो. उत्साह वाढतो. लोकांकडून चित्रे पाहिल्यानंतर कौतुक होते. त्यातच जीवन जगण्याचा आनंद सापडला आहे. 

- रावसाहेब चक्रनारायण, सुरक्षारक्षक 

पिंपरी : कलाकार हा नेहमी अस्वस्थ असतो. तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त होतोच. जगण्याच्या संघर्षात स्वतःची आवड जोपासू न शकलेले रहाटणी-नखातेवस्ती येथील सुरक्षारक्षक रावसाहेब चक्रनारायण हे निवृत्तीनंतर चित्रकलेची आवड जपत आहेत. पिंपरीतील खासगी बँकेच्या एटीएमची सुरक्षाविषयक जबाबदारी सांभाळतानाच पेन्सिल स्केचद्वारे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र काढण्यात त्यांनी हातखंडा मिळविला आहे. 

रावसाहेब हे मूळचे नेवासा (जि. अहमदनगर) येथील रहिवासी. नोकरी-व्यवसायानिमित्त रहाटणीला आले. भोसरी औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीत वेल्डर, फिटरचे काम करून रोजीरोटीचा प्रश्‍न सोडविला. निवृत्तीनंतर पिंपरीतील एका खासगी बॅंकेच्या एटीएमसाठी सुरक्षारक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. एटीएमची सुरक्षा करतानाच स्वतःची चित्रकलेची आवडदेखील ते जोपासत आहेत. त्यांची चित्रे पाहून एटीएममध्ये येणारे नागरिक त्यांच्याकडून स्वतःची चित्रे काढून घेतात. तसेच त्यांना बक्षिसेदेखील देऊ करतात.

नेवासा येथील ज्ञानोदय हायस्कूलमध्ये त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. चित्रकलेतील कोणत्याही प्रकारचे शिक्षण न झालेल्या या अवलिया चित्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सरावातून चित्रकलेतील कौशल्य मिळविले. गेल्या चार वर्षांपासून पेन्सिल स्केचद्वारे व्यक्तिचित्रण करण्यावर त्यांचा भर आहे.

राजकीय पुढारी, अभिनेते, अभिनेत्री यांची वृत्तपत्रात छापून आलेली छायाचित्रे पाहून त्यावरून ते हुबेहूब चित्र काढतात. त्याशिवाय लहान मुलांपासून ते थेट ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींची चित्रे ते काढून देतात. दिवसभरात एक ते दोन चित्र काढून पूर्ण करतात. त्यांचे काम व त्यांचे चित्रकलेतील कौशल्य पाहून बॅंकेनेदेखील त्यांचा सत्कार केला आहे.

Web Title: Security Guard Artist Draw Painting with pencil