वाघोलीत वॉचमनचा त्याच्याच बंदुकीने खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे/वाघोली : चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाचीच बंदूक हिसकावून घेत त्याच्यावर गोळी झाडून खून केला. ही घटना वाघोली परिसरात टीसीआय (TCI) कंपनीच्या गोडावूनमध्ये रविवारी मध्यरात्री घडली. 

पुणे/वाघोली : चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाचीच बंदूक हिसकावून घेत त्याच्यावर गोळी झाडून खून केला. ही घटना वाघोली परिसरात टीसीआय (TCI) कंपनीच्या गोडावूनमध्ये रविवारी मध्यरात्री घडली. 

शिवाजी सदाशिव काजळे (वय 30, रा. साईसत्यम पार्क, वाघोली) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. ते मूळ परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्‍यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. ते वाघोली येथील TCI कंपनीच्या गोडावूनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. 
रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास 3 अज्ञात व्यक्‍ती कंपनीच्या गोडावूनमध्ये आल्या. त्यांनी ट्रकचालक आहोत, असे सांगून त्यापैकी एकाने मुलगा झाला आहे, म्हणत सुरक्षा रक्षकांना पेढे दिले आणि तेथून निघून गेले. हे पेढे खाल्ल्यामुळे सुरक्षा रक्षकांना गुंगी आली. त्यानंतर तिघे चोरटे पुन्हा मध्यरात्री पाऊणच्या सुमारास गोडावूनमध्ये आले.

त्यांनी तेथील सीसीटीव्हीचे वायर कापून ते भिंतीच्या दिशेने फिरवले. काजळे यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी काजळे यांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडली. तसेच, चाकूने वार केले. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या काजळे यांनी आरडाओरडा केला. तो आवाज ऐकून तेथील सुरक्षारक्षक जे.पी. पांडे यांच्यासह इतर लोक धावून आले. त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.