शिवसेनेकडून सुविधांचा ‘मोफत’ नामा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने पीएमपी बससेवा मोफत करू, ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधोपचार, पाच वर्ष पाणीपट्टीत वाढ करणार नाही, महिलांसाठी प्रत्येक प्रभागात स्वच्छतागृह उभारू आणि झोपडपट्टीवासीयांना सेवा शुल्क माफ करू, यासह विविध आश्‍वासने शिवसेनेने आपल्या वचननामातून दिली आहेत.

पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने पीएमपी बससेवा मोफत करू, ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधोपचार, पाच वर्ष पाणीपट्टीत वाढ करणार नाही, महिलांसाठी प्रत्येक प्रभागात स्वच्छतागृह उभारू आणि झोपडपट्टीवासीयांना सेवा शुल्क माफ करू, यासह विविध आश्‍वासने शिवसेनेने आपल्या वचननामातून दिली आहेत.

पक्षाच्या वतीने बुधवारी पक्षाचा खासदार आणि सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. राज्यमंत्री विजय शिवतरे, माजी मंत्री शशिकांत सुतार, संपर्कप्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण, निर्मला केंढे, सचिन तावरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. गेल्या पंधरा वर्षांत शहरात विकासाचा जो ‘बॅकलॉग’ राहिला आहे; तो महापालिकेत स्वबळावर सत्तेवर आल्यानंतर तो भरून काढू, असे आश्‍वासनही यात शिवसेनेने दिले आहे. शहराच्या पुढील दहा वर्षांचे विकासाचे नियोजन वचनमान्याच्या निमित्ताने करण्यात असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

वीस पानांच्या या वचननाम्यात वाहतूक, पर्यावरण, पाणीपुरवठा, सांडपाणी, रस्ते, आरोग्य, ई-गव्हर्नन्स इत्यादी गोष्टींवर भर देण्यात आला आहे. मोफत योजना राबविण्यासाठी निधीची गरज भासणार आहे. त्यासाठी खासगी सहभागातून आणि राज्य, केंद्र सरकारच्या अनुदानातून हा निधी उभारू, असे आश्‍वासन यात देण्यात आले आहे. विकास आराखड्याची शंभर टक्के अंमलबजावणी, ‘एचसीएमटीआर’ रस्त्याची विक्रमी वेळेत उभारणी, स्वतंत्र कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना, मेट्रो प्रकल्पाची गतीने उभारणी, टेकड्यांचे संवर्धनासाठी ‘ॲक्‍शन टेकन कमिटी’, रोजगारनिर्मितीला प्राधान्य, विधानसभा मतदारसंघनिहाय ‘डे केअर सेंटर’ व सायकल शेअर योजना सुरू करण्याचे आश्‍वासनेही पक्षाकडून देण्यात आले आहे.