अनेकांना पुरातत्त्वविद्येची गोडी लावणाऱ्या ताई 

नीला शर्मा 
शुक्रवार, 10 मार्च 2017

पुरातन काळच्या वास्तू, मूर्ती, नाणी वगैरे जणू त्यांच्याशी बोलू लागतात. शतकांपूर्वीची एखादी संस्कृती उत्खननातून निरनिराळ्या वस्तूंच्या माध्यमातून त्यांच्यासमोर उलगडली जाते. स्वत: वयाची तिशी उलटून गेल्यावर पुरातत्त्वीय अभ्यासप्रकल्पांकडे वळलेल्या शुभांगना अत्रे यांनी नंतर अनेकांना या विषयाची गोडी लावली. 

पुरातन काळच्या वास्तू, मूर्ती, नाणी वगैरे जणू त्यांच्याशी बोलू लागतात. शतकांपूर्वीची एखादी संस्कृती उत्खननातून निरनिराळ्या वस्तूंच्या माध्यमातून त्यांच्यासमोर उलगडली जाते. स्वत: वयाची तिशी उलटून गेल्यावर पुरातत्त्वीय अभ्यासप्रकल्पांकडे वळलेल्या शुभांगना अत्रे यांनी नंतर अनेकांना या विषयाची गोडी लावली. 

मोहेंजोदडो-हडप्पा येथे सापडलेल्या पुरातन वास्तू व वस्तूंचा अभ्यास करून त्यांनी "सिंधू संस्कृतीतील लोकांचे धर्मजीवन' या विषयात पी.एचडी. केली. त्या म्हणतात, ""सिंधू संस्कृतीच्या काळात जगभर ज्या विविध संस्कृती नांदत होत्या, त्यांच्यात एक धागा समान दिसतो. मध्यवर्ती देवतेच्या रूपात सर्वत्र स्त्रीप्रतिमा आढळतात.'' या संदर्भातले आणि इतरही निष्कर्ष त्यांनी मांडले, त्यापैकी कित्येक निष्कर्ष विविध संदर्भपुस्तकं किंवा संबंधित नियतकालिकांमध्ये समाविष्ट केले. 

मूळच्या पुण्याच्या असलेल्या शुभांगनाताई लग्नानंतर मुंबईला गेल्या. सामाजिक लोकसंख्याशास्त्र विषयांतर्गत "कुटुंब नियोजनासंबंधीच्या बदलत्या कल्पना' या विषयावर त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रबंध सादर केला. नंतर यजमानांना नोकरीतील कामानिमित्त दोन वर्षं जपानला राहावं लागलं, तिथं यांनीही भाषांतरतज्ज्ञ म्हणून काम केलं. पुण्यात आल्यावर प्राच्यविद्येच्या अभ्यासक्रमाची माहिती मिळाल्यानं तिकडं वळल्या. मग त्यातच पदवी, पदव्युत्तर असे टप्पे पार केले. 

मराठी साहित्य विषयातील पदव्युत्तर परीक्षेत आधी त्या पहिल्या आलेल्याच होत्या. नंतर इंडॉलॉजी विषयातील पदव्युत्तर परीक्षेत दुसऱ्या आणि आर्कियोलॉजीत पहिल्या आल्या. डेक्कन कॉलेजमध्ये सहयोगी व्याख्याती म्हणून कामाची संधी चालून आली. केंब्रिज विद्यापीठाची अभ्यासवृत्ती मिळाल्यानं दोन वर्षांसाठी त्या तिथं पाश्‍चात्य पुराकथांचा अभ्यास करायला गेल्या. "इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च'तर्फेही त्यांना अभ्यासवृत्ती मिळाली. इनामगावच्या 1980 मध्ये सुरू झालेल्या उत्खननाचा वृत्तांत लिहिण्यात त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्रातील कवठे, वाळकी येथील उत्खननातून सापडलेल्या ताम्रपाषाण युगीन स्थळाच्या अभ्यासातही त्यांचा वाटा होता. पोप जॉन पॉल द्वारा जागतिक कोशात हिंदू संस्कृतीतील धर्मविषयक अभ्यासावर आधारित त्यांचं लेखन आमंत्रित केलं. त्यानिमित्तानं व्हॅटिकन सिटीतील पोपच्या महालात जाणारी मी पहिली भारतीय हिंदू स्त्री ठरले, असं त्या सांगतात. 

शुभांगनाताईंनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राच्यविद्या विभागातही काही काळ अध्यापन केलेलं आहे. 

त्या म्हणतात, विद्यार्थ्यांना निरनिराळ्या अंगांनी अनेक विषय उलगडून सांगत गेले. ललित लेखन व व्याख्यानांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत हा विषय नेला. बालभारतीसाठी या संदर्भात पाठ्यपुस्तकांचं संपादन व लेखन करतानाही मनात हेच होतं की, या विद्यार्थ्यांना पृथ्वीच्या जन्मापासून आजतागायतचा इतिहास जाणून घ्यायची गोडी लागावी. शुभांगनाताई निवृत्तीनंतरही या अभ्यासात बुडालेल्या असतात.

Web Title: Shubhanga Atre