साध्या उपायांतूनही ‘स्वाइन फ्लू’ रोखणे शक्‍य

साध्या उपायांतूनही ‘स्वाइन फ्लू’ रोखणे शक्‍य

पुणे - ‘‘हात धुण्यापासून खोकताना तोंडावर रुमाल धरण्यापर्यंतच्या अनेक साध्या उपायांचा अवलंब करत वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवल्यास राज्यात वेगाने वाढणारा स्वाइन फ्लू रोखता येईल,’’ असा विश्‍वास आरोग्य खात्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केला.

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार रुग्ण आणि गर्भवतींनी सरकारी रुग्णालयांमधून स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘सकाळ संवाद’अंतर्गत ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘स्वाइन फ्लू’विषयी सविस्तर माहिती दिली.

डॉ. आवटे म्हणाले, ‘‘रुग्णाच्या शिंकण्या किंवा खोकण्यातून बाहेर पडणाऱ्या बारीक शिंतोड्यातून स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ या विषाणूंचा संसर्ग निरोगी व्यक्तीला होतो. तसेच रुग्णाच्या तोंडातून बाहेर पडलेल्या या थेंबांना स्पर्श झाल्यानंतर तोच हात नाक, तोंड किंवा डोळ्यांना लागल्यास त्यातून निरोगी व्यक्तीच्या शरीरात हे विषाणू प्रवेश करतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरणे आदी शिस्त बाळगण्याची गरज आहे. त्यातून ‘एच१एन१’सारख्या विषाणूंचा संसर्ग निश्‍चित कमी होईल.’’

स्वाइन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध झाली असून, ती घेतल्यास ८ महिने ते एक वर्ष या विषाणूंपासून नागरिकांचे संरक्षण होऊ शकते. जोखमीच्या रुग्णांनी दरवर्षी ही लस घेणे अगत्याचे ठरते. राज्यात स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुसंख्य रुग्णांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार होते किंवा गर्भवती होत्या. त्यामुळे हे आजार असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लू होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. इतर नागरिकांसाठी ती बाजारपेठेत उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यात स्वाइन फ्लू वाढत असल्याचे चित्र दिसत असल्याबद्दल डॉ. आवटे म्हणाले, ‘‘आपल्या राज्यात सर्वेक्षणाची यंत्रणा सक्रिय आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) आपल्या जवळ आहे. तसेच काही खासगी प्रयोगशाळांनाही आपण या विषाणूंची तपासणी करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रोगनिदानाचे प्रमाण जास्त आहे.’’ इन्फ्ल्यूएंझातील ‘ए’ प्रकारचा विषाणू सातत्याने स्वतःमध्ये बदल करतो. सध्या ‘एच१एन१’च्या या विषाणूंमध्ये काहीसा बदल झाला आहे. त्यामुळे राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे निरीक्षण आहे.

कोकणात स्वाइन फ्लू नाही
राज्याच्या अनेक भागांत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असले, तरी कोकणात मात्र एकही रुग्ण नाही. याचे कारण तापमानात आहे. कमाल आणि किमान तापमानात कमीतकमी फरक असेल, तर हा विषाणू जिवंत राहात नाही. पुण्यात मार्चच्या पूर्वार्धात पहाटे थंडी आणि दुपारी चटका असा तापमानाचा किमान दुप्पट फरक असल्याने हा विषाणू फोफावला. परिणामी राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले. एकट्या पुण्यात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक, नगर, औरंगाबाद, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, असे निरीक्षणही डॉ. आवटे यांनी नोंदविले.

वर्षातून दोन वेळा उद्रेक
स्वाइन फ्लूचा २००९ पासून केलेल्या अभ्यासानुसार जानेवारी ते एप्रिल असा उद्रेकाचा पहिला टप्पा असतो. एप्रिल, मे आणि जूनमध्ये याच्या संसर्गाचे प्रमाण कमी होते. जुलैनंतर या रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरवात होते. डिसेंबरपर्यंत त्याची तीव्रता पुन्हा कमी होत असल्याचा निष्कर्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com