लोणावळ्यात साठ लाखांच्या जुन्या नोटा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

लोणावळा - चलनातून बाद झालेल्या साठ लाखांच्या जुन्या नोटा लोणावळा पोलिसांनी जप्त केल्या. पुणे-मुंबई महामार्गालगत कैलास पर्वत हॉटेलजवळ गुरुवारी (ता.16) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. 

एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी काही जण लोणावळ्यात आले होते. पोलिसांना याची कुणकुण लागल्यावर पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या पथकातील कर्मचारी व्ही. ई. जांभळे, जे. व्ही. देवकर, ए. सी. वडेकर आदींनी येथील हॉटेल कैलास पर्वतजवळ संशयित मोटार (एमएच 14 इवाय 3504) अडविली. मोटारीतील श्‍याम गोरख शिंदे (वय 45, एरंडवणे, पुणे), रोहिदास जवाहर वाघिरे (वय 43, रा. वाघिरे आळी, पिंपरीगाव), बालाजी निवृत्ती चिद्रावार (वय 65, रा. वडगाव शेरी, पुणे) आणि प्रशांत सुभाष शेवते (वय 45, रा. हडपसर, पुणे) यांच्याकडे चौकशी केली. दरम्यान, मोटारीच्या डिक्कीत पोलिसांना चलनातून बाद झालेल्या नोटांचे बंडल आढळून आले. बालाजी चिद्रावार व प्रशांत शेवते यांनी जुन्या नोटा बदलून नवीन नोटा देतो, असे सांगितले होते. त्यामुळे नोटा घेऊन आल्याचे श्‍याम शिंदे यांनी पोलिसांना सांगितले. या नोटा प्राप्तिकर विभागाकडे पोलिसांनी सोपविल्या आहेत.