कृत्रिम बुडबुडे, छोटा रोबोट

सलील उरुणकर 
बुधवार, 22 मार्च 2017

पुणे - विज्ञानाधारित खेळणी बनविणे.. रासायनिक पदार्थांच्या आधारे बुडबुडे निर्माण करणे... आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये आणखी वस्तू, पदार्थ कशा बसवता येतील, या दृष्टीने त्याचे ‘रि-डिझायनिंग’ करणे.. प्रत्यक्षात एखादा छोटा रोबोट तयार करणे.. या सर्व गमतीजमती महाविद्यालयांत नाही, तर शाळांमध्ये सहावी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुला-मुलींना शिकविण्यास सुरवात झाली आहे. 

पुणे - विज्ञानाधारित खेळणी बनविणे.. रासायनिक पदार्थांच्या आधारे बुडबुडे निर्माण करणे... आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये आणखी वस्तू, पदार्थ कशा बसवता येतील, या दृष्टीने त्याचे ‘रि-डिझायनिंग’ करणे.. प्रत्यक्षात एखादा छोटा रोबोट तयार करणे.. या सर्व गमतीजमती महाविद्यालयांत नाही, तर शाळांमध्ये सहावी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुला-मुलींना शिकविण्यास सुरवात झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातील सात शाळांमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली आहे. लहान मुलांमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना आणि विचार विकसित करण्याच्या दृष्टीने ‘अटल इनोव्हेशन मिशन’अंतर्गत ‘टिंकरिंग लॅब’ स्थापन करण्यासाठी ‘नीती आयोगा’ने देशभरातून निवडलेल्या २५७ शाळांमध्ये पुणे जिल्ह्यातील या सात शाळांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील एकूण २७ शाळा निवडण्यात आल्या आहेत. या शाळांना पाच वर्षांत एकूण २० लाखांचा निधी मिळणार असून, त्यापैकी १२ लाख रुपये मिळाले आहेत. उर्वरित रक्कम दोन लाख रुपये प्रतिवर्षी अशी एकूण चार वर्षात जमा होणार आहे. 

निवड झालेल्या शाळा 
- दिल्ली पब्लिक स्कूल, कोंढवा, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, एमईएस राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, पिरंगुट, एमईएस बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, कोथरूड, मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर, विश्‍वकर्मा विद्यालय इंग्लिश मीडियम, बिबवेवाडी, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, बारामती.

विद्यार्थ्यांनी केले प्रयोग
ज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञानशोधिका विभागाच्या समन्वयक वेदवती काटकर म्हणाल्या, ‘‘बुडबुडे तयार करण्यासाठीचे सर्व साहित्य मुलांसाठी तयार ठेवण्यात आले होते. त्यामध्ये साबणाचे पाणी, शांपूची पाकिटे, बेकिंग पावडर, ग्लिसिरिन, साखर इत्यादींचा समावेश होता. लहान-मोठ्या आकाराचे बुडबुडे बनविण्याचे कोणत्या पदार्थांचे मिश्रण किती प्रमाणात करावे, याचे प्रयोग मुलांनी केले; तसेच आवश्‍यक परिणाम साधण्यासाठी हाताच्या हालचाली विशिष्ट प्रकारे कराव्या लागतात हेसुद्धा विद्यार्थ्यांना समजले. प्रयोगाखेर मुलांनी योग्य मिश्रणाचे तपशील लिहून ठेवले.’’

पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची कार्यशाळा आणि आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चार स्पर्धा घेणे. बायोटेक व रोबोटिक्‍सविषयी इंटरनेटवरून माहिती घेऊन सादरीकरण करणे, विज्ञानाधारित तसेच हायड्रॉलिक खेळणी तयार करणे, फ्रिजचे रि-डिझायनिंग करणे, विविध वस्तूंचे भाग सुटे करून ते पुन्हा जोडणे अशा स्वरूपाच्या या स्पर्धा होत्या. पालक व शिक्षक मिळून एकूण ३० जणांची ‘टीम’ मुलांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे. यापुढील मार्गदर्शनासाठी एप्रिल महिन्यात दिल्लीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- मनोज देवळेकर, उपप्रमुख, ज्ञान प्रबोधिनी केंद्र, निगडी

‘प्लॅस्टिक रिसायकलिंग’ आणि रोबोटिक्‍स या विषयांची माहिती देण्याचे नियोजन आहे. प्लॅस्टिकच्या पुनर्वापराच्या प्रक्रियेतील यंत्र, साहित्यासह सर्व तपशील मुलांना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘भाऊ’ इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना विशिष्ट उपक्रम पूर्ण करण्यासाठी दिले जाणार आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी छोटा रोबॉट तयार करावा, अशी त्यामागची संकल्पना आहे. 
- डॉ. भरत व्हनकटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘एमईएस’ इंग्लिश स्कूल

टिंकरिंग लॅब म्हणजे काय?
देशामध्ये दहा लाख नवसंशोधक विद्यार्थी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात येत आहेत. त्यासाठी शाळांनी किमान १५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या ‘लॅब’च्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि तीन प्रतिष्ठित स्थानिक व्यक्ती किंवा संशोधक, अभ्यासक यांची पाच-सदस्यीय समिती असेल. अटल इनोव्हेशन मिशन किंवा नीती आयोगाचे प्रतिनिधी वेळोवेळी या लॅबची पाहणी करतील.

टिंकरिंग लॅबमध्ये काय?
टिंकरिंग लॅबमध्ये किमान ६६ उपकरणे, यंत्रे असावीत असे नीती आयोगाने शाळांना कळविले आहे. प्राथमिक टप्प्यात दिलेला दहा लाख रुपयांचा निधी उपकरणे विकत घेण्यासाठी आहे. यामध्ये मेकॅनिकल, पॉवर सप्लायपासून इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्‍सकरिता उपयुक्त असलेल्या मोटार, रोबो किट्‌स, आरएफआयडी रीडर, मोशन सेन्सर, जीएसएम मॉड्युल तसेच - थ्रीडी प्रिंटरसारख्या रॅपिड प्रोटोटायपिंग टूल्सचा समावेश आहे. 

व्हिडीओ गॅलरी