शनिवारवाड्यासमोरील भुयारी मार्गाचे सुशोभीकरण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पुणे - शनिवारवाड्यासमोर विस्मृतीत गेलेल्या भुयारी मार्गाच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. 

पुणे - शनिवारवाड्यासमोर विस्मृतीत गेलेल्या भुयारी मार्गाच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. 

बॅंक ऑफ महाराष्ट्रने 1987 च्या सुमारास हा भुयारी मार्ग महापालिकेला बांधून दिला होता. पादचाऱ्यांना त्याद्वारे रस्ता ओलांडता येईल, असे अपेक्षित होते; मात्र त्याचा फारसा वापर झाला नाही. मधल्या काळात या भुयारी मार्गांचा वापर भलत्याच कारणासाठी होत होता. त्यामुळे या मार्गाचे सुशोभीकरण करावे, यासाठी नगरसेविका मुक्ता टिळक आणि नगरसेवक हेमंत रासने यांनी 2016-17 च्या अर्थसंकल्पात 15 लाख रुपयांची तरतूद व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार एक महिन्यापूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यातील टाइल्स बदलण्यात आल्या असून, फुलझाडे लावण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पथदिवेही बसविण्याचे काम सुरू झाले आहे. संपूर्ण भुयारी मार्गाला रंगरंगोटी करण्यात आली असून, दोन्ही बाजूंची प्रवेशद्वारेही सुशोभित केली आहेत. नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी तेथे फलकही बसविले आहेत. या प्रकल्पाचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता संभाजी खोत यांनी सांगितले. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक आणि रासने यांच्या उपस्थितीत येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.