हुमणीचा विळखा (व्हिडिओ)

Sugarcane and humani
Sugarcane and humani

हुमणी किडीने उसाच्या पिकाला विळखा घातला आहे. त्यामुळे शेतकरी रंडकुडीला आले आहेत. एका एकरातील हुमणीच्या व्यवस्थापनासाठी येणारा ५ ते ६ हजारांचा खर्च करूनही पीक हाताला लागत नसल्याने बळिराजाची चिंता वाढली आहे. हुमणीच्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आदेश द्यावेत व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून एकरी मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मो समी पावसाने फिरवलेली पाठ, परतीचाही रुसलेला पाऊस, या अस्मानी संकटाने शेतकरी हादरले असतानाच सप्टेंबर महिन्यातील तापमान चार अंशांनी वाढले आहे आणि अशातच हुमणी किडीने उसाच्या पिकाला विळखा घातला आहे. एकट्या इंदापूर तालुक्‍यात १४ हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला असून, उसाची आख्खी बेटे उद्‌ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी रंडकुडीला आले आहेत. दीड महिन्यापूर्वी फक्त एक एकर क्षेत्रात आढळलेली हुमणी आता अनेक गावांतील उसाचे पीक उद्‌ध्वस्त करीत आहे. सहज हात लावताच आख्खे उसाचे बेटच हातात लागत असल्याने शेतकरी हादरले आहेत.

तापमानाची गेल्या तीन वर्षांतील सप्टेंबर महिन्याची तुलना करता या वर्षी कमाल तापमानात सरासरी ४ अंशांची वाढ झाली आहे. या वर्षी मोसमी पावसानेही पाठ फिरवल्याने तालुक्‍यात उष्मा वाढला आहे. कधी नव्हे, ते सध्या कमाल तापमान ३६ अंश व किमान तापमान २५ अंशांवर आहे. त्यामुळे हुमणीचा वाढलेला प्रादुर्भाव व दुसरीकडे तहानलेली पिके, असे विरोधाभासी चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आजवर पावसाळ्यात कधी पिके करपली नाहीत, ते चित्र सध्या पाहायला मिळत आहे.


एकरी सहा हजार खर्च
इंदापूर व बारामती तालुक्‍यात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे कोरड्या पडलेल्या पिकांना हुमणीने जबरदस्त तडाखा दिला आहे. अगोदरच भाजीपाला, फळांच्या बाजारात उत्पादकांना दणका बसल्याने एकमेव आशा असलेल्या उसाच्या पिकालाही नुकसानीचा फटका बसण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अगोदरच पाण्याची वानवा असल्याने पिके कोरडी पडली आहेत. एका एकरातील हुमणीच्या व्यवस्थापनासाठी येणारा ५ ते ६ हजारांचा खर्च करूनही पीक हाताला लागत नसल्याने बळिराजाची चिंता वाढली आहे.

कारखान्यांकडून सर्वेक्षण सुरू
सध्या साखर कारखान्यांच्या पातळीवर हुमणीने बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण सुरू आहे. छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हुमणीचा पूर्ण तडाखा बसलेले क्षेत्र २ हजार एकरांवर असल्याची माहिती कारखान्याचे शेतकी अधिकारी अनिल राऊत यांनी दिली. अजूनही सर्वेक्षण सुरू असून, खोडव्याचे क्षेत्र वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली, तर दुसरीकडे नीरा- भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४ हजार २०० एकरांपर्यंत हुमणीने विळखा घातल्याची भीती या कारखान्याचे शेतकी अधिकारी ए. एच. पाताळे यांनी व्यक्त केली. हुमणीचा प्रादुर्भाव या क्षेत्रावर २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

पंचनामे करण्याची मागणी
कापसाच्या बोंडअळी किंवा उसावरील लोकरी माव्यापेक्षाही परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हुमणीच्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आदेश द्यावेत व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून एकरी मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

हुमणीने बाधित क्षेत्र (एकरात)
१४,००० - इंदापूर तालुका
४,२०० - नीरा-भीमा साखर कारखाना कार्यक्षेत्र
२,००० - छत्रपती साखर कारखाना कार्यक्षेत्र  

माझा लासुर्णे (ता. इंदापूर) येथे १४ एकर ऊस आहे. संपूर्ण उसाला हुमणीच्या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे हात लावला की उसाची अख्खी बेटे हातात येतात. या पिकासाठी मी मोठ्या प्रमाणात पीककर्ज काढलेले असून, या उसाच्या उत्पन्नावर माझी सारी मदार आहे. हुमणी नियंत्रणाचे सगळे प्रयोग मी केले, मात्र आताची हुमणी या औषधांना जुमानतच नाही, अशी स्थिती आहे.   
- नीलेश पाटील, ऊस उत्पादक शेतकरी

राज्यात गाळपासाठी ११.४२ लाख हेक्‍टर ऊस उपलब्ध असला, तरी हुमणीने राज्यभरातील उसाला अक्षरशः मगरमिठी मारली आहे. त्यामुळे या वर्षीचा गळीत हंगाम पुढे ढकलण्याची वेळ ओढवेल, अशी गंभीर परिस्थिती आहे. जनसंघर्ष यात्रेनिमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रात हुमणीचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून आले आहे. हजारो कोटींचे नुकसान होत असताना कृषी विभागाचे मात्र याकडील दुर्लक्ष अक्षम्य आहे.
 - हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com