हॉलंडमध्येही अशी 'पोचली' सुरतेची लूट

shivaji maharaj
shivaji maharaj

पुणे: शिवचरित्राचा जेव्हाही उल्लेख केला जाईल, तेव्हा शिवरायांच्या कारकिर्दीतील एक अतिशय महत्त्वाची घटना असणाऱ्या सुरतेच्या लुटीच्या उल्लेखाविना ते कधीही पूर्ण होऊच शकणार नाही, एवढे महत्त्व या घटनेचे निश्‍चितच आहे. अवघा महाराष्ट्र मुलूख वा भारतच नव्हे, तर या घटनेची दखल त्याकाळी चक्क हॉलंडमधील काही वृत्तपत्रांनीही घेतली असल्याचे आता प्रकाशात आले आहे. पुणेकर इतिहास अभ्यासक निखिल बेल्लारीकर यांच्या प्रयत्नांतून ही माहिती पुढे आली आहे.

मुघलांच्या ताब्यात असलेल्या आणि तत्कालीन श्रीमंत बाजारपेठ असलेल्या सुरत शहराची शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या सोबतीने केलेली लूट ही एवढी गाजली होती, की तिने मुघलांसह जगभरातील अनेकांना चकित करून सोडले होते. एखाद्या शहरावर जोरदार चाल करत जाऊन मोहीम फत्ते केल्याच्या या घटनेची नोंद त्या काळी जेथे मुद्रणकला पोचली होती, अशा विविध युरोपीय देशांनी आवर्जून घेतली होती. यापैकी हॉलंडमधील "ऑपरेश्‍च हार्लेम कॉरन्ट' या साप्ताहिक वृत्तपत्रातील काही वैशिष्ट्यपूर्ण नोंदी बेल्लारीकर यांच्या हाती आल्या आहेत. तेथील द हेग या ठिकाणच्या रॉयल लायब्ररीच्या माध्यमातून काही जुनी डच वर्तमानपत्रे चाळताना या लुटीचा उल्लेख करणाऱ्या तब्बल चार बातम्या त्यांना मिळाल्या आहेत.

तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी अर्थात 1670 मध्ये 3 ते 6 ऑक्‍टोबर या चार दिवसांत झालेल्या या लुटीची बातमी प्रकाशित करणाऱ्या बातम्या 30 डिसेंबर 1670, 27 जून 1671, 22 ऑगस्ट 1671 आणि 19 नोव्हेंबर 1671 या चार अंकांत प्रसिद्ध झाल्या होत्या.

महराजांना हॅनिबलची उपमा
बेल्लारीकर म्हणाले, "एक शक्तिशाली बंडखोर मुघलांविरुद्ध उभा ठाकला आहे. तीस हजारांच्या फौजेनिशी त्याने सुरत शहर जाळले असून, जवळपास निम्मे शहर त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असे कळते. मुघल बादशहाची त्यावर काही मात्रा चालली नाही,' असा उल्लेख या बातम्यांत दिसतो. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख स्पष्टपणे नसला, तरी एके ठिकाणी त्यांचा उल्लेख "हॅनिबल' असा केला आहे, जो विशेष महत्त्वाचा आहे. एकेकाळी रोमन सत्तेला धक्का देणारा एक शूर योद्धा म्हणून हॅनिबलची इतिहासाला ओळख आहे. तसाच धक्का शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेला दिला, अशी ब्रिटिशांची धारणा होती. त्यांनी महाराजांना हॅनिबलच्या नावाने उल्लेखिल्याने हे स्पष्ट होते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com