पुण्याच्या जागेसाठी दहा उमेदवार रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - विधान परिषद निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) रिंगणातून बाहेर पडली आहे. उमेदवारी अर्जासोबत थकबाकी नसल्याचे शपथपत्र (प्रतिज्ञापत्र) न दिल्यामुळे पक्षाचे उमेदवार बाबू ऊर्फ राजेंद्र वागस्कर यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी बाद झाला. त्यामुळे चार प्रमुख पक्षांसह दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान असणार आहे. 

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व अर्जांची जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत आज छाननी करण्यात आली. त्यामध्ये मनसेचे उमेदवार वागस्कर यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत आपल्याकडे कोणत्याही स्वरूपाची सरकारी थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्र न जोडल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. आपल्यावर कोणत्याही स्वरूपाची सरकारी थकबाकी नाही, गुन्हा दाखल नाही, असे प्रतिज्ञापत्र जोडणे निवडणूक आयोगाने उमेदवारांना बंधनकारक केले आहे, ते वागस्कर यांनी न दिल्यामुळे हा अर्ज अवैध ठरविण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

त्यामुळे परिषदेच्या निवडणुकीसाठी दहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शनिवारी (ता. 5) आहे. यामध्ये 
किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, बंडखोरी रोखण्यात पक्षांना कितपत यश येते यावर या निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे 
अनिल भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस), अशोक येनपुरे (भाजप), संजय जगताप (कॉंग्रेस), ज्ञानेश्‍वर खंडागळे (शिवसेना), विलास लांडे (राष्ट्रवादी बंडखोर) 
केदार (गणेश) गायकवाड, गोपाळ तिवारी (कॉंग्रेस डमी), प्रकाश गोरे (अपक्ष), बापू थिगळे (अपक्ष), यशराज पारखी (अपक्ष) 

मनसे न्यायालयात जाणार 
उमेदवारी अर्जासोबत मालमत्ता व थकबाकीसंदर्भात स्वतंत्र प्रतिज्ञापत्र न दिल्याच्या कारणामुळे वागस्कर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे; परंतु वागस्कर यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अ आणि ब असे दोन विभाग करून वरील सर्व तपशील उमेदवारी अर्ज भरतेवेळी दिला होता, तरीदेखील उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे वागस्कर हे त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहेत. 
- अजय शिंदे, शहराध्यक्ष, मनसे

Web Title: Ten candidates for Pune Vidhan Parishad Seat