'निविदा प्रक्रियेबाबतचा अहवाल दोन दिवसांत '

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांच्या निविदा प्रक्रियेबाबतचा सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत राज्य सरकारला पाठविण्यात येईल. त्या संदर्भात महापालिका प्रशासनाला सूचना केली आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी दिली. मात्र, या प्रक्रियेत अनियमितता नसेल, असेही त्या म्हणाल्या. 

पुणे - नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांच्या निविदा प्रक्रियेबाबतचा सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत राज्य सरकारला पाठविण्यात येईल. त्या संदर्भात महापालिका प्रशासनाला सूचना केली आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी दिली. मात्र, या प्रक्रियेत अनियमितता नसेल, असेही त्या म्हणाल्या. 

नागरिकांना चोवीस तास समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल 2 हजार 818 कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्याकरिता पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी 103 पाण्याच्या टाक्‍या उभारण्यात येणार असून, त्यापैकी 83 टाक्‍यांची कामे सुरू केली आहेत. मात्र, त्यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत, या कामांना स्थगिती देण्याची मागणी विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली होती. त्यानुसार पाण्याच्या टाक्‍यांच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास खात्याने गुरुवारी घेतला. त्यामुळे ही कामे थांबवावी लागणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर टिळक यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पाणीपुवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. पाण्याच्या टाक्‍यांची नेमकी निविदा प्रक्रिया, त्याचे टप्पे, याबाबतचा सविस्तर अहवाल दोन दिवसांत नगरविकास खात्याला पाठविण्याची सूचना महापौरांनी केली. 

महापौर टिळक म्हणाल्या, ""नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्याच्या या योजनेतील पाण्याच्या टाक्‍यांच्या निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती राज्य सरकारने मागविली आहे. त्यात, टाक्‍या बांधण्यात येणारी ठिकाणे, त्याचे भूसंपादन आणि परवानगी याचीही माहिती अहवालात असेल. निविदा प्रक्रियेत काही त्रुटी असल्याचे दिसून आल्यास त्याची चौकशी केली जाईल. त्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करू.'' 

दरम्यान, योजनेच्या पुढील टप्प्यातील कामांचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयामुळे प्रस्ताव लांबणीवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

स्थगिती देऊन पुणेकरांना "रिटर्न गिफ्ट' 
निवडणुकीत पुणेकरांनी निर्विवाद बहुमत दिल्याने पाण्याच्या टाक्‍यांच्या कामांना स्थगिती देऊन राज्य सरकारने पुणेकरांना "रिटर्न गिफ्ट' दिले, अशा शब्दांत महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते चेतन तुपे यांनी सरकारवर टीका केली. पुणेकरांना स्वच्छ व समान पाणी मिळाले पाहिजे. शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रोखण्याची सरकारची मानसिकता असून, भाजपमधील गटातटाच्या राजकारणामुळे ही योजना फसविण्याचा डाव आहे. मात्र, तो हाणून पाडू, असा इशाराही तुपे यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केली.

Web Title: The tender process reported in two days