मांजरीमध्ये स्मशानभूमी परिसराची दूरावस्था

कृष्णकांत कोबल
शनिवार, 26 मे 2018

मांजरी - येथील स्मशानभूमी परिसरातील नदी शेजारी तोडलेल्या बांधकामाचा राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. त्यामुळे येथील नदी पात्रासह वाढी लागलेल्या झाडांनाही धोका निर्माण झाला आहे.

मांजरी - येथील स्मशानभूमी परिसरातील नदी शेजारी तोडलेल्या बांधकामाचा राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. त्यामुळे येथील नदी पात्रासह वाढी लागलेल्या झाडांनाही धोका निर्माण झाला आहे.

काही वर्षांपूर्वी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतने स्मशानभूमीचा विकास करताना शेजारील ओबडधोबड जागेवर काळी माती टाकून विविध प्रकारचे वृक्ष लावले. या वृक्षांची चांगल्या पध्दतीने वाढ झाली असून, पादचाऱ्यांना त्याची सावली विश्रांतीसाठी खुणावत आहे. नदी प्रवाहामुळे रस्त्याच्या बाजूने होणारी धूप रोखण्यास त्यामुळे मोठी मदत झाली आहे. मात्र, गेली काही दिवसांपासून या परिसरात तोडलेल्या बांधकामाचा राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे.

हा राडारोडा टाकण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे येथील झाडांचे नुकसान होऊ लागले आहे. स्मशानभूमी परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. राडारोड्याच्या टेकड्या ऊभ्या राहू लागल्याने नदीपात्रालाही धोका निर्माण झाला आहे. वाटसरुंना सावलीला मुकावे लागत आहे. 

ग्रामपंचायत किंवा महसूल विभागाकडून राडारोडा टाकण्यास प्रतिबंध केला जात नसल्याने त्यामध्ये दररोजच भर पडू लागली आहे. राडारोडा टाकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी व या परिसराच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करणारे सूचनाफलक येथे लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: there is a deterioration of the cremation ground